23 October, 2024
दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात 123 अर्जांची उचल • वसमत येथे एक नामनिर्देशनपत्र दाखल
हिंगोली, दि. 23(जिमाका): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात 56 इच्छुकांनी 123 अर्जांची उचल केली आहे. तर 92-वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ लिंबाजी अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. तर आज दुसऱ्या दिवशी 56 इच्छुकांकडून 123 अशा दोन दिवसात जिल्ह्यात 276 अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
यावेळी 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, 94-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment