24 October, 2024
लोहगाव येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि.२४ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप पथकामार्फत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या निर्देशानुसार लोहगाव येथे स्वीप समितीने मतदारांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांच्या नेतृत्वात हिंगोली विधानसभास्तरीय स्वीप पथकामार्फत 94 हिंगोली विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने आज लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व माध्यमिक आश्रम शाळा येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नोडल अधिकारी नितीन नेटके यांनी शालेय विद्यार्थ्यांना संकल्प पत्राविषयीचे मार्गदर्शन करून आपले पालक आई-वडील, भाऊ-बहीण यांच्याकडून 100% मतदान करून घेण्यासंदर्भात आग्रह धरण्याचे आवाहन केले. माध्यमिक आश्रम शाळा येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व तसेच ELC CLUB स्थापन करून याद्वारे विविध उपक्रम राबवण्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे देखील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याची हमी दिली.
या वेळी स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके यांच्या समवेत स्वीप सदस्य संजय मेथेकर, श्याम स्वामी, राजकुमार मोरगे, विनोद चव्हाण, सुदर्शन सोवितकर, माणिक डोखळे उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment