24 October, 2024
तिसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात 58 अर्जांची उचल • वसमत येथे एक, कळमनुरी येथे एक, हिंगोली येथे तीन नामनिर्देशनपत्र दाखल
हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात 28 इच्छुकांनी 58 अर्जांची उचल केली आहे. यामध्ये 92-वसमत विधानसभा मतदार संघात 8 जणांनी 8 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 10 जणांनी 23 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 10 जणांकडून 27 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 28 इच्छुकांकडून 58 अर्जांची उचल केली आहे. तर 92-वसमत विधानसभा मतदारसंघात गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज (जनसुराज्य शक्ती पक्ष) यांनी 1, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना) यांनी 1 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात तानाजी सखाराम मुटकुळे (भाजपा) यांनी 2, भाऊ पाटील गोरेगावकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी 1 असे एकूण 3 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी 123 तर आज तिसऱ्या दिवशी 28 इच्छुकांकडून 58 अर्जांची विक्री झाली आहे. अशा तीन दिवसात जिल्ह्यात 334 अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
यावेळी 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, 94-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 29 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment