07 April, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँक व पोस्ट ऑफीसकरीता प्रतिबंधात्मक आदेश जारी




हिंगोली,दि.07:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामाय जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका होत असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन सर्व बँकामध्ये गर्दी व विविध लोकांनी हाताळलेले पासबुक  व चलनी नोटा यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँक आणि पोस्ट ऑफिस यांना खालील सूचना देवून त्याचे पालन करणे बाबत आदेशित करण्यात येत आहे.   
या आदेशान्वये (1) नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँक – पोस्ट ऑफिस मध्ये जावे. (2) सर्दी,ताप,खोकला इत्यादीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. (3) मुख्य प्रवेशद्वारावर गार्ड नेमण्यात यावा तसेच शाखेमध्ये एका वेळेस फक्त 4 ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. (4) पोस्ट व बँकामध्ये येणा-या ग्राहकांची एका काऊंटरवर एका वेळी एकच  ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी. (5) ग्राहकांनी बँकेच्या काऊंटर पासून 3 ते 5 फुटांचे अंतर ठेवावे. (6) सर्व बँका सकाळी 10.00 ते 02.00 पर्यंत रोखीचे व्यवहार करु शकतील. (7) बँक फक्त रोख पैसे देणे व पैसे जमा करुन देणे व पैसे पाठविणे व मागविणे हे काम करु शकतील. (8) कर्ज विषयक कामे बंद राहतील. (9) सर्व ग्राहकांनी दिनांक 14 एप्रिल, 2020 पर्यंत आर्थीक व्यवहाराशी संबंधीत नसलेल्या बाबीसाठी जसे की, शिल्लक रक्कम चौकशी, केवायसी अद्यावतीकरण, आधार कार्ड व पॅन कार्ड संलग्नीकरण, बँक खाते अद्यावतीकरण, बँक स्टेटमेंट, पासबुक प्रिंटींग इत्यादी व इतर यासाठी बँकेत येवू नये. (10) पोस्ट ऑफीस व बँकेच्या एटीएम मध्ये एका वेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरीत ग्राहकांना 02 ते 03 फुट अंतरावर थांबण्यास सांगावे, एटीएम मशीनचे दरवाजे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. (11) सर्व बँकांनी आप-आपल्या शाखेतील एटीएम, कॅश, चेक, डिपॉजिट मशिन, पासबुक, प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. (12) बँकेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना हात धुन्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. (13) बँक इमारत  व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. (14) सर्व ग्राहकांनी बँकेच्या इतर वितरण पर्यायांचा उदा. इंटरनेट बँकीग, मोबाईल बँकींग, युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इ. सुविधांचा जास्तीत-जास्त वापर करणेबाबत बँकानी नागरीकांना प्रेरित करावे. (15) सर्व शाखा आपल्या कर्मचाऱ्यांच्या किमान उप‍स्थिती संबंधी योजना करुन ग्राहकांना सेवाप्रदान करतील. एक अधिकारी असलेल्या शाखांच्या कामकाजांच्या संदर्भात बँक सुचित करतील अशा शाखा आवश्यकता असल्यास एक दिवस आड काम करतील.
आदेशात विहित करण्यात आलेल्या निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड सहिता (1860 चा 45) याच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी-पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा

·   दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी

-पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

         हिंगोली दि. 07: कोरोनाचा संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाने जे प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहेत. त्याचे जिल्ह्यातील जनतेने काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे. 
जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण (पॉझिटिव्ह) असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच खबरदारी म्हणून काहीं नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडुन सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे संचार बंदीच्या काळात शासन आणि प्रशासन याबाबतीत सतर्क असून जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी योग्य नियोजन करण्यात येत आहे. परंतु आता गरज आहे ते तुमच्या सहकार्याची. सहकार्य फक्त एवढेच करा प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करा. घरातच राहा आणि आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची दक्षता घ्या. त्यामुळे संचार बंदीच्या कालावधीत घरातून कोणीही बाहेर पडू नका. अशी विनंती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
तसेच दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज, जिल्हा पानिपत हरियाणा, राज्यस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात धार्मिक कार्यक्रमास जिल्ह्यातील जे नागरिक जावून आले आहेत. त्या सर्व नागरिकांनी स्वतःहून समोर येवून आपली माहिती जिल्हा प्रशासनास देवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी . याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सर्वांना केले आहे.
*****

06 April, 2020

भाजीपाल व किराणा दूकाने 10 एप्रिलला सुरु ठेवता येणार -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी



हिंगोली,दि.6: जागतीक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.
यानुसार जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरीता एक दिवस आड याप्रमाणे वेळापत्रक निश्चित करुन देण्यात आले होते. परंतू भाजीपाला व किराणा सामान खरेदीच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात नागरिक विनाकारण  दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करतांना दिसुन आले आहे. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेकरीता भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरीता एक दिवस आड याप्रमाणे वेळापत्रकात बदल करण्यात येत असुन, आता भाजीपाला व किराणा सामानाची दूकाने ही शुक्रवार दि. 10 एप्रिल, 2020 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतरची परवानगी व वेळ पुढील आदेशान्वये कळविण्यात येणार आहेत. तसेच सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा तालूकास्तरावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी



                               
हिंगोली, दि.6: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज, जिल्हा पानिपत हरियाणा, राज्यस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात धार्मिक कार्यक्रमास जिल्ह्यातील जे नागरिक जावून आले आहेत. तसेच येथील (जिल्ह्यातील) नागरिकांच्या संपर्कात आले असतील अशा सर्व नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती पुढील हेल्पलाईन क्रमांकावर  साधुन द्यावी.
हेल्पलाईन क्रमांक : 1) श्री. चंद्रकांत सुर्यवंशी निवासी उपजिल्हाधिकरी तथा नोडल अधिकारी (कोवीड -19)  जि.अ. का., हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9422612394,  2) श्री. राजेंद्र गळगे नायब तहसिलदार (म.) जि.अ. का., हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9422188972, 3) श्री. आर. आर. कंजे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हिंगोली भ्रमणनध्वनी क्रमांक : 9405408939 या क्रमांकावर संपर्क साधून आपली माहिती द्यावी. याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल.
कोरोना विषाणूस प्रतिबंध हाच कोविड -19 यावर उपाय असल्याने आपण आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपला गाव हे कोरोना विषाणूच्या संसर्गापासुन वाचविण्यासाठी पुढाकार घेवुन सहकार्य करावे, असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपण जमात या कार्यक्रमास सामील झाल्याची माहिती प्रशासनापासुन जाणीवपुर्वक लपवुन ठेवल्यास व त्यातुन पुढे भविष्यात आपण कोरोना बाधित आढळुन आल्यास जाणीवपुर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग  केल्याबद्दल आपणां विरुध्द भारतीय दंडविधान-1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे वरील विषयक काही माहिती असल्यास वर दिलेल्या हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधुन जिल्हा प्रशासनास माहिती देवुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात 12 एप्रिलपासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध



हिंगोली (दि.6 एप्रिल): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 6 एप्रिल,2020  या सहा दिवसात हिंगोली जिल्ह्यातील 31 हजार 012 शिधापत्रिका धारकांना आजपर्यंत 6 हजार 215.21 क्विंटल अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 8.43 लाख आहेत. या लाभार्थ्यांना 797 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जात आहे.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 4 हजार 063.83 क्विंटल गहू, 2 हजार 151.38 क्विंटल तांदूळ, तर 42.45 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 42 हजार 308 शेतकरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल,2020 मध्ये प्रति व्यक्ती 03 किलो गहु व 02 किलेा तांदुळ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ दि. 12 एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम वाशिम कडून प्राप्त करून घेतले जात असुन दि. 12 एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई-
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गावामध्ये अन्नधान्य उचल केल्यावर रास्तभाव दुकानदार यांनी लॉउड स्पिकरद्वारे लाभार्थ्यांना कळवुन अन्नधान्य पुरवठा करावा, रास्तभाव दुकानदार अन्नधान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना 01 मिटर अंतरावर उभे करणेसाठी मार्कीग करावी व अन्नधान्य वाटप करावे, तसेच मास्क व सॅनिटाईझरचा वापर करण्यासाठी लाभार्थ्यांना व रास्तभाव दुकानदार यांना वापर करणेसाठी सक्त आव्हान मा.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
*****


02 April, 2020

हिंगोली जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत एक रुग्ण तर चार संशयीत रुग्ण दाखल


हिंगोली जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत एक रुग्ण तर चार संशयीत रुग्ण दाखल
·   सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर, नागरिकांनी घाबरुन जावू नये.
·   नागरिकांनी घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांचे आवाहन

हिंगोली दि.2: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा (कोविड-19) एक बाधीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले असुन त्यावर उपचार सुरु आहेत.
कोरोना बाधीत रुग्ण हा पुरुष असुन त्याचे वय 49 वर्ष आहे. या रुग्णांस दि. 31 मार्च, 2020 रोजी सकाळी 2 वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. हा रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांस जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे दाखल करुन त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार सुरु आहे. या रुग्णांचा थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर थ्रोट स्वॅब अहवाल प्राप्त झाला असून तो ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
तर दि. 1 आणि 2 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात चार संशयीत रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये पहिला रुग्ण एक 11 वर्षाची मुलगी असुन तिला ताप, सर्दी, खोकला आणि श्वासनाचा त्रास होत असल्याने भरती करण्यात आले आहे. तसेच दुसरा रुग्ण हा कझाकिस्तानवरुन आलेल्या आणि होम क्वॉरंनटाईन ठेवलेल्या व्यक्तीचा भाऊ असुन त्याला ताप-सर्दीचे लक्षणे असल्याने त्यास आणि तिसरा रुग्ण कझाकिस्तानवरुन आलेला व्यक्तीला भरती करण्यात आले आहे. तर चौथा संशयीत रुग्ण हा पुरुष असून त्यांचे वय 35 वर्ष आहे. हा रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यास भरती करण्यात आले आहे. या चार रुग्णांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेतले असून, त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार करण्यात येत आहे. तसेच या चार ही रुग्णांचे थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन, लवकरच त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे. या चार ही रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
तसेच मालदिव येथून आलेल्या 02 नागरिकांना सद्यस्थितीत होम क्वारंनटाईन (घरातच विलगीकरण) मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रॅपीड रिस्पॉन्स टिम व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दरदिवशी या दोन्ही रुग्णांवर देखरेख ठेवून पाठपुरावा करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन यंत्रणा ही योग्य समन्वयाने हिंगोलीकरांसाठी कार्यरत असुन, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनी देखील घाबरुन न जाता आपली आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी आवाहन केले आहे.

****


01 April, 2020

एकत्रितपणे दक्षता पाळून नागरिकांनी कोरोना संकटाचा सामना करावा -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


हिंगोली,दि.01: कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणेकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत आहे त्यांच्या सूचनांचे पालन करा पुढील काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या काळात कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.      
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी व घराबाहेर पडणे टाळण्याची दक्षता घेतलीच गेली पाहिजे सर्वांनी एकत्रितपणे दक्षता पाळून कोरोना संकटाचा सामना करू एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदीसह विविध पावले उचलली आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा व गर्दीही टाळली जावी, या हेतूने घरपोच सेवेचीही तरतूद करण्यात आली असुन शिवभोजनच्या माध्यमातून देखील गरजु लोकांना जेवण पुरविले जात आहे.  या काळात नागरिकांनीही आवश्यक सूचनांचे पालन करावे गर्दी टाळणे व घरी राहणे हाच दक्षतेचा उपाय आहे. या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होऊ शकते त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर-गांव सुरक्षित ठेवणे ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. वेळेचे गांभीर्य ओळखा कृपया कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाईन नंबर प्रसारित केले आहेत त्यावर संपर्क करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी  संपर्क साधा मात्र, घराबाहेर पडू नका आपली अन आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
*****