हिंगोली,दि.01: कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासन,
आरोग्य व पोलीस यंत्रणेकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत आहे त्यांच्या सूचनांचे
पालन करा पुढील काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या काळात कुणीही अनावश्यक
कारणासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले
आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर आहे.
त्यामुळे नागरिकांनी गर्दी व घराबाहेर पडणे टाळण्याची दक्षता घेतलीच गेली पाहिजे सर्वांनी
एकत्रितपणे दक्षता पाळून कोरोना संकटाचा सामना करू एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ
नये म्हणून सरकारने संचारबंदीसह विविध पावले उचलली आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा व्हावा व गर्दीही टाळली जावी, या हेतूने घरपोच सेवेचीही तरतूद करण्यात आली असुन
शिवभोजनच्या माध्यमातून देखील गरजु लोकांना जेवण पुरविले जात आहे. या काळात नागरिकांनीही आवश्यक सूचनांचे पालन करावे
गर्दी टाळणे व घरी राहणे हाच दक्षतेचा उपाय आहे. या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास
त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होऊ शकते त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर-गांव
सुरक्षित ठेवणे ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. वेळेचे गांभीर्य ओळखा कृपया कुणीही
अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाईन
नंबर प्रसारित केले आहेत त्यावर संपर्क करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत
जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधा मात्र, घराबाहेर पडू नका आपली अन आपल्या
कुटुंबियांची काळजी घ्यावी. आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे
आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment