31 March, 2020

जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे दोन संशयीत रुग्ण दाखल



हिंगोली दि.31: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) आजाराचे दोन संशयीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये पाहिला संशयीत रुग्ण हा पुरुष असून त्यांचे वय 54 वर्ष असून, या रुग्णांस दि. 30 मार्च, 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता तर दुसऱ्या 49 वर्षीय संशयीत पुरुष रुग्णांस दि. 31 मार्च, 2020 रोजी सकाळी 2 वाजता येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे.  हे दोन्ही रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे दाखल करुन त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार करण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णांचा थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे.
कझाकिस्तान मधुन आलेला 01 तर मालदिव येथून आलेल्या 02 अशा एकुण 03 नागरिकांना सद्यस्थितीत होम क्वारंनटांईन (घरातच विलगीकरण) मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रॅपीड रिस्पॉन्स टिम व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दरदिवशी सदर रुग्णांवर देखरेख ठेवून पाठपुरावा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांना अहवान करण्यात येते की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये केले आहे.


No comments: