24 March, 2020



हिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे
                                      -- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
हिंगोली, दि. 24 : हिंगोलीकरांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला परंतु, पुढील काही दिवस हे अत्यंत संवेदनशील आहेत. जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य  करावं असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.      
जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्‍याबाबतची नियमावली देखील तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्‍य मंत्रालयांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, याकरिता जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागु केले आहेत. सदर आदेश हे आपल्या आरोग्याच्या संरक्षणाकरिता घेण्यात आले असून जनतेनी आपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे मी आवाहन करीत आहे.                                                                                      
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दुरध्वनी वरुन घेतला आणि आवश्यक त्या सुचना केल्या. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले, भविष्यातही असेच सहकार्य कायम ठेवून आपण सर्वजण मिळून या संकटावर मात करु असा विश्वास पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केला.
*****

No comments: