25 March, 2020


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषधी दुकानासाठी वेळ निश्चित

हिंगोली,दि.25: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍याचे परिणाम आरोग्‍यास धोकादायक आहे. त्याकरीता जिल्हाधिकारी यांचे दि. 22 मार्च, 2020 रोजीच्य आदेशान्वये जिवनावश्यक वस्तुंची दूकाने, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, व औषधी दूकाने इत्यादी वगळून हिंगोली जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील औषधी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन औषधी दुकानांवर नागरिकांची होणादी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील दवाखान्याशी संलग्न औषधी दुकाने हॉस्पीटलच्या वेळेनुसार सुरु राहतील. तसेच डॉक्टरच्या चिठ्ठीनुसारच औषधी उपलब्ध करुन देतील. दवाखान्याची वेळ हीच त्यांची वेळ असेल. तसेच  अन्य औषधी दुकाने दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेमार्फत शहर निहाय काही दूरध्वनी क्रमांक दिले जातील ते डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार अन्य वेळेत औषधी उपलब्ध करुन देतील.
याशिवाय हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेने मेडिकल कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी स्टिकर्स द्यावेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र संबंधीत तहसिल कार्यालयातुन हस्तगत करावीत. त्याकरीता कर्मचारी यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक दोन फोटोसह यादी सादर करावी. हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना यांनी प्रत्येक शहरनिहाय औषधी उपलब्ध करुन देणाऱ्या संबंधीतांची नावे व मोबाईल क्रमांक इ. तपशील असलेली यादी तात्काळ प्रसिध्द करावी. वरील आदेशाच्या कालावधीत जनतेला औषधी मिळण्याकरीता कोणत्याही प्रकारे विलंब अथवा त्रास होणार नाही याची दक्षता संघटना तसेच संबंधीत औषध विक्रेत्यांनी घ्यावी.
या आदेशाचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, पोलीस अधिक्षक, हिंगोली, अधिक्षक, राजय उत्पादन शुल्क, हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा हिंगोली, सहा. आयुक्त अन्न्‍ व औषध प्रशासन, परभणी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इ. असणार आहे.
वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

No comments: