23 March, 2020


कोरोनाचा पार्श्वभूमीवर व्हीआरआरटी पथकाची स्थापना

          हिंगोली,दि.23: आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये हिंगोली जिल्ह्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशातंर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असून तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळुन आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ उपाय योजना आखणे आवश्यक आहे. संशयित रुग्णामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवु नये यासाठी बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम पातळीवर प्रत्येक गाव निहाय व्हीआरआरटी (Village Rapid Response Team ) पथकाची स्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
या व्हीआरआरटी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती यांचे सयुंक्त पथक स्थापन करुन त्यांच्यामार्फत गावामध्ये-गावाबाहेर गावावरुन आलेल्या किंवा येणाऱ्या प्रवाशांची पथकामार्फत नोंद घेण्यात येवून, विहीत नमुन्यातील (Self Assessment Form) भरुन घेण्यात येणार आहे. आलेल्या प्रवाशास सर्दी, ताप, खोकला सदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य उपकेंद्राकडे कळवून तात्काळ उपकेंद्रात पाठविण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातून आलेल्यांचा शोध घेणे, तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस (Home Quarantine) घरामध्येच अलग ठेवणे व प्रवाशी दररोज घराबाहेर पडणार नाही याची या पथकाकडून दखल घेण्यात येणार आहे.
व्हीआरआरटी पथकास आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास संपर्क साधावयाचा झाल्यास त्यांनी 02456-221450 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****


No comments: