14 March, 2020

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू


·   सर्दी-खोकला असे लक्षण दिसल्यास डॉक्टरांना घरी बोलवून तपासणी करुन घेण्याचे आवाहन

             हिंगोली,दि.14: आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयीत रुग्ण हिंगोली शहरात आढळून येण्याची शक्यता असून यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर तात्काळ सनियंत्रण करुन संसर्गात वाढ होऊ नये तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचे आदेश दिले दिले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास (मो. क्र. 91300 53862)  यांची तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार (मो. क्र. 70574 67627) यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. कंजे (मो. क्र. 94054 08939) तर कोरोना प्रतिबंधबाबत पुर्वतयारी आणि प्रत्यक्ष अमंलबजावणीसाठी नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी (मो. क्र. 94226 12394) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशानुसार संबंधीत विभागाना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी उपाययोजना आखण्यात यावी. कोरोना विषाणुच्या संसर्गबाबत आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करावे व सदर माहिती पुस्तिकांचे वितरण करावे. स्वतंत्र वैद्यकिय पथके तयार करुन पुर्ण वेळ तैनात करावी. संशयित रुग्णांचा पोलीस विभाग व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन तपास घ्यावा. खाजगी रुग्णालये सहकार्य करीत नसल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. नमूद परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विविध रुग्णालये / दवाखाने यांना योग्य ते निर्देश वेळोवेळी देण्यात येऊन त्यांची अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. आवश्यक औषधसाठा उपलब्ध करावा. गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करावी. कॉरटाईन आणि आयसोलेशन युनिट स्थापन करावे. यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. कोरोना विषाणुसंबंधी नियंत्रण कक्ष स्थापन करावे. जिल्हा आणि तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करावे तथा याबाबत वेळोवेळी संदेश प्रसारीत करावे. अफवा किंवा खोटे संदेश प्रसारीत करीत असल्यास त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हात धुण्याचे सेनिटाईझर्स आणि मास्कची काळा बाजार करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यात यावी. आवश्यरकतेनूसार खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करणे तसेच खाजगी हॉस्पीरटल  मधील साधन सामुग्री अधिग्रहीत करण्याचे अधिकार देण्यात येत आहे.
पोलिस प्रशासनाने परदेशातुन आलेल्या नागरीकांची माहिती संकलित करावी. ज्या हॉटेलमध्ये व नातेवाईकांकडे नागरीक मुक्कामास आहेत किंवा कसे त्यांची माहिती एकत्रित करुन जिल्हा रुग्णालयास कळवावी. कोरोना विषाणु संसर्गाबाबत सोशल मिडियाच्यात माध्यामातुन अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. सायबर सेल मार्फत तसेच अफवांवर नियंत्रण ठेवावे. कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेवर आधारित प्रमाणित कार्यपध्दती तयार करावी. ज्या  हॉटेलमध्ये विदेशी नागरीक व परदेशावरुन येणारे नागरीक मुक्कामी असतील त्या ठिकाणी भेटी देऊन खात्री करुन घ्यावी गर्दीच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी व त्यांचे सहकार्य घ्यावे. परदेशी नागरीक अथवा परदेशातुन प्रवास करुन आलेले भारतीय नागरीक याबाबत संबंधित पोलिस स्टेाशन प्रभारी यांना आयसी यांना माहिती वेळोवेळी देण्याच्या सूचना द्याव्यात. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये अथवा परावृत्त् करावे. आपल्या अधिनस्त् अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवावा.
नगर परिषद आणि नगर पंचायत प्रशासनाने औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत  चुकीचे समज पसरवणे इ. बाब निदर्शनास आल्यास तात्काळ आयसी यांना माहिती दयावी. स्वतंत्र वैद्यकिय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्ये खबरदारीची उपाययोजना योग्य ती जनजागृती प्रचार व प्रसिध्दी देण्यात यावी. आपल्या विभागामार्फत मदत केंद्र व माहिती केंद्र  तात्काळ स्थापन करुन 24 तास सुरू ठेवावे. आपले कार्यक्षेत्रातील रेल्वेस परिसर, बस स्टॅन्ड, मॉल, चित्रपट गृहे येथे स्वच्छता ठेवावी. संशयित रुग्णांसाठी स्वातंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र जिल्हा् नियंत्रण कक्ष व मदत केंद्राची स्था‍पना करावी. मदत केंद्र व माहिती केंद्र  तात्काळ आपल्या विभागामार्फत 24 तास सुरू ठेवावे. या माहिती केंद्रात पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. दैनंदिन प्रगतीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चूकीचे समज पसरविणे इ. बाब निदर्शनास आल्यास अन्न व औषध प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. होर्डिंग्ज, जिंगल्स, हस्तपत्रिका, पोस्टार, स्टीकर यांचे माध्यमातून जनजागृती करावी. शासनाने वेळेावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करत योग्य कार्यवाही करावी. हे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कायदयातील कलम 30 अन्वये दिलेले असल्याने त्याचे पालन करणे सबंधीतास बंधनकारक आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या् अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करावी. ग्रामस्तरावर स्व्च्छता ठेवावी. केरकचरा जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी. टोल फ्रि क्र. 104 तसेच राज्यास्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 -26127394 व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्य नागरीकांना द्यावी. स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्ये खबरदारीची उपाययोजना योग्य ती जनजागृती प्रचार व प्रसिध्दी करावी. यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. प्रमाणित कार्यपध्दती तयार करावी. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे. मदत केंद्र व माहिती केंद्र तात्काळ आपल्या विभागामार्फत 24 तास सुरू करावे. अंगणवाडी व शाळांमध्ये याबाबतचे प्रबोधन करावे.
अन्न औषध प्रशासनाने औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चूकीचे समज पसरवणे आदी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ आयसी यांना माहिती दयावी. व योग्य कार्यवाही करावी. सर्व औषध विक्रेते दुकानाची तपासणी करण्यात यावी. त्यांचे माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. औषध विक्रेत्यांना अधिक किंमतीत औषधे न विकण्याची जाणीव करून दयावी. कोरोना संसर्गाबाबत औषध विक्रेत्यांनी जनजागृती करावी. औषध विक्रेत्यांसाठी समन्वय बैठकीचे आयोजन करावे.
स्वतंत्र माहिती व मदत कक्षाची स्थापना
कोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. टोल फ्री क्रमांक 104 कार्यान्वीत करण्यात आला आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे या जबाबदाऱ्यादेखील सनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
तसेच कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला असे लक्षण दिसतात. तेंव्हा जिल्ह्यात किंवा आपल्या गावात दूसऱ्या गावातून, राज्यातून किंवा देशातून आलेल्या नागरिकांनी त्यांना सर्दी, खोकला, डोके दूखी, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे किंवा निमोनिया, फुफ्फूसात सूज असा त्रास असल्यास त्यांनी घराबाहेर न पडता आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तपासणी करीता डॉक्टरांना घरी बोलवून तपासणी करुन घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
सर्व विभागांनी जबाबदारीच्यां अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना सादर करावा. कोरोना  विषाणू  संसर्गाबाबत जिल्ह्यातील सर्व विभागाकडून प्राप्‍त होणाऱ्या दैनंदिन अहवालाची एकत्रित माहिती जिल्हा शल्‍य चिकित्सनक हिंगोली यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच सदर विषयांबाबत वेळोवेळी आवश्याकतेनूसार बैठकांचे आयोजन करून त्याबाबत संबंधीतांना अवगत करावे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कलम 51, 55, 56 व 57 नूसार कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
****

No comments: