महिला आरोग्य कर्मचारीस
मारहाण वृत्ताबाबत खुलासा
हिंगोली,दि.27: कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता दि. 23
ते दि. 31 मार्च, 2020 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहण्याऱ्या
जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व महत्वाच्या विविध शासकीय यंत्रणा कार्यरत
आहेत. बुधवार दि. 25 मार्च रोजी कोरोना प्रादूर्भाव संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी
कर्तव्यावर असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानतंर्गत कार्यरत प्रियंका साहेबराव
राठोड, आरोग्य सहाय्यीका या महिला कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडून वडील पोलिस हवलदार
साहेबराव सखाराम राठोड यांच्यासोबत घराकडे जात असतांना येथील अग्रेसन चौकात पोलिसांनी
मारहाण केल्याचे वृत्त दि. 26 मार्च रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आले.
परंतू महिला कर्मचारी यांचे वडील
पोलिस हवलदार साहेबराव सखाराम राठोड यांनी दि. 26 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय, हिंगोली येथे येवून
आपला जबाब दिल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे. या जबाबामध्ये श्री. राठोड
यांनी सांगितले की, ‘दि. 26 मार्च रोजी मी व माझी मुलगी प्रियंका साहेबराव राठोड नांदेड
नाक्यावरुन घरी जात असतांना कोरोना विषाणु संदर्भात बंदोबस्तामध्ये असलेल्या सपोनि
श्रीमती पुडंगे यांनी मला व माझ्या मुलीला नांदेड नाक्यावर थांबविले. तेंव्हा माझी
मुलगी पोलीस मारतील या भीतीपोटी गाडीवरुन घाई गडबडीने खाली उतरत असतांना तिचा तोल जावून
खाली पडली. व तिच्या डोक्याला मार लागला. तेंव्हा माझा असा गैरसमज झाला की, ड्युटीवर
असलेल्या सपोनि श्रीमती पुंडगे यांनी माझ्या मुलीला मारहाण केल्याने तिच्या डोक्याला
दूखापत होवून ती बेशुध्द पडली. तेव्हा सपोनि पुंडगे यांनीच माझ्या मुलीला दवाखान्यात
नेले. तसेच मी रागाच्या भरात डॉ. झडपे यांच्या दवाखान्यात गेलो असता तेथे उपस्थिती
काही पत्रकारांनी मला थांबवून काय प्रकार झाला याबाबत विचारणा केली. तेव्हा मी माझ्या
मुलीला मार लागल्याच्या टेन्शनमध्ये असतांना पत्रकारांनी मला विचारपूस करीत मला काही
एक समजू न देता माझी शुटींग केली.व सदर शुटींग व्हॉट्सॲपवर व्हायरल केली. परंतू नंतर
माझ्या मुलीकडून मला कळले की, ती गाडीवरुन उतरतांना खाली पडली व तिच्या डोक्याला जखम
झाली. माझा सपोनि श्रीमती पुंडगे यांच्याबद्दल गैरसमज झाल्याने मी रागाच्या भरात पत्रकारासमोर
बोललो व त्यांनी मला काही माहिती न होवू देता माझी शुटींग केली व व्हॉटसॲपवर व्हायरल
केली. त्याबाबत मला काही माहिती नव्हती. व्हॉट्सॲप ग्रुपवर पाहिल्या नंतर मला हा सर्व
प्रकार समजला.
सपोनि श्रीमती पुंडगे यांनी घडलेला
सर्व प्रकार मला व्यवस्थीत सांगितल्याने माझा गैरसमज दूर झाला असून माझी तसेच माझी
मुलगी प्रियंका साहेबराव राठोड आम्हा दोघांची
सपोनी श्रीमती पुंडगे व इतर कोणांविरुध्द तक्रार नसुन माझा गैरसमज दुरु झाला असुन याप्रकाराबाबत
मी दिलगीरी व्यक्त करतो.’ असा जबाब महिला आरोग्य कर्मचारी प्रियंका साहेबराव राठोड
यांच्या वडीलांनी पोलीस विभागाकडे नोंदविला आहे.
या घटनेची दखल जिल्ह्याच्या पालकमंत्री
वर्षाताई गायकवाड यांनी घेवून, या घटनेबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांच्याशी
चर्चा करुन त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तरी सर्व वृत्तपत्रांनी सदर घटनेबाबत प्रसिध्द
झालेल्या वृत्ताबाबतचा वरील खुलासा आपल्या वृत्तपत्रात प्रसिध्द करावा.
****
No comments:
Post a Comment