16 April, 2020

शासन निर्देशानुसार लाभार्थ्यांना धान्य वितरण न करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील पाच रास्तभाव दूकानदारांवर कारवाई




हिंगोली,दि.16:  राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरीकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत गरजवंताना जीवनाश्यक वस्तुचा पुरवठा करण्याचे व्यवस्थीत नियोजन केले आहे. जिल्ह्यातील रास्तभाव दुकानामार्फत लाभार्थ्यांना अन्नधान्य शासन निर्णयानुसार वितरण करण्याबाबत सर्व रास्तभाव दूकानदार आणि किराणा दूकानदारांना निर्देश देण्यात आले होते.
परंतू शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शिधा पत्रिकाधारकांना धान्य वितरण न केल्यामुळे चार स्वस्त धान्य दूकानदार आणि एक किराणा दूकानदारांवर पुरवठा विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालूक्यातील पांगरी येथील नामदेव निवृत्ती टापरे-निलंबीत, रास्तभाव दूकानदार, कळमनुरी तालूक्यातील आखाडा बाळापूर येथील ओमप्रकाश नारायण ठमके रास्तभाव दूकानदार-निलंबीत व गुन्हा दाखल, कळमनुरी येथील प्रकाश बन्सीलाल वर्मा रास्तभाव दूकानदार-निलंबीत, कळमनुरी तालूक्यातील रेडगाव येथील रामराव गंगाराम कांबळे रास्तभाव दूकानदार -निलंबीत आणि कळमनुरी तालूक्यातील आखाडा बाळापूर येथील श्री दत्त किराणा ॲड जनरल स्टोअर्स यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दूकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होणार नाही. त्यांना अन्नधान्य प्राप्त होईल, एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचीत राहणार नाही, तसेच अन्नधान्य मिळाले नसल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच अन्नधान्य वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी  शासन निर्देशानुसार लाभधारकांना अन्नधान्य वितरीत करावे. तसेच रेशन दुकानदारांनी लभार्थ्यांना हात धुण्यासाठी सॅनीटायझर किंवा हॅन्ड वॉश उपलब्ध करुन द्यावे. दुकानावर मालाचे वितरण करतांना गर्दी होणार नाही सामाजिक अंतर राखले जाईल यादृष्टीने उपाययोजना कराव्यात असे अवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

No comments: