14 April, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील सिमा राहणार बंद




हिंगोली,दि.14:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीक ही हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरीक, प्रवासी यांचेमार्फत करोना विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना (कोवीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याकरीता जिल्हा सिमा बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरातुन जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
वरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी व अत्यावश्यक सेवा यांचेसाठी लागु राहणार नाहीत. सदरील आदेश दि. 15 एप्रिल, 2020 ते दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

No comments: