09 February, 2021

रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा गार्ड पदासाठी माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, दि. 09 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांकडून रिजर्व बँक ऑफ इंडिया यांनी सुरक्षा गार्ड पदासाठी अर्ज मागितले आहेत. याची संपूर्ण माहिती रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx  या संकेतस्थळावर दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी वरील संकेतस्थळावर जाऊन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करुन अर्ज (फार्म) भरावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालायाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

 

 

हयातनगर येथील हयातपाशा दर्गा व बाराशीव येथील जागृत हनुमानची यात्रा रद्द

 


 

हिंगोली, दि. 09 (जिमाका) : जिल्ह्यातील मौजे हयातनगर येथे हयातपाशा दर्गा उरुसची यात्रा दि. 10 फेब्रुवारी, 2021 ते 14 फेब्रुवारी, 2021 तसेच मौजे बाराशिव येथे जागृत हनुमानची यात्रा दि. 27 फेब्रुवारी, 2021 ते 08 मार्च, 2021 या कालावधीत भरणार आहे. सध्या संपूर्ण देशभर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे दोन्ही ठिकाणांच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कोरोना आजारावर अद्याप पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय नसल्याने त्यामुळे मौजे हयातनगर येथे हयातपाशा दर्गा उरुस व मौजे बाराशिव जागृत हनुमान येथील ठिकाणांच्या यात्रेस जमणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. तसेच या पुढील कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक जमा होणारे धार्मिक कार्यक्रम, मेळावे, यात्रा महोत्सव साजरा करण्यास जनहितार्थ  प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये. तसेच जिवित हानी होवू नये या दृष्टीने सुरक्ष‍िततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये मौजे हयातनगर येथील हयातपाशा दर्गा उरुसची यात्रा दि. 10 फेब्रुवारी, 2021 ते 14 फेब्रुवारी 2021 तसेच मौजे बाराशिव येथील जागृत हनुमानची यात्रा दि. 27 फेब्रुवारी, 2021 ते दि. 08 मार्च, 2021 या कालावधीमध्ये भरणाऱ्या यात्रा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन रद्द केले आहेत .

 

*****

विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनव उपक्रम

 


             हिंगोली, दि. 09 (जिमाका) : विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी ‘‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग @’’ हा अभिनव उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पुणे येथील उच्च शिक्षण विभागाचे संचालक इत्यादी मान्यवर दि. 13 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. 

या उपक्रमात विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था यांच्या अडी-अडचणीवर चर्चा करुन त्या सोडविण्यासाठी काही प्रश्न, अडीअडचणी व उच्च शिक्षणाच्या विकासविषयक सूचना असतील तर त्या jdhe.nanded-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे सहसंचालक (उच्च शिक्षण), नांदेड विभाग, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

04 February, 2021

रेशीम उद्योगातून 40 शेतकऱ्यांनी कमावले दिड लाखाच्या वर उत्पन्न रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली दि. 04 (जिमाका) : कोरोना सारखी महामारी असतांना जवळ जवळ सर्व पिकांचे भाव पडले होते. त्यावेळी शेतकरी चिंतेत होता. मध्येच पिक काढायच्या वेळी अतिवृष्टी होऊन हातात आलेले पिक वाया गेले. अशावेळी रेशीम शेतकरी मात्र ताठ उभा राहीला असून अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सन 2020-2021 मध्ये जिल्ह्यातील जवळपास 40 च्या वर शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून दिड लाखाच्यावर उत्पन्न घेत आहेत. तसेच 100 शेतकरी एक लाखाच्या जवळ उत्पन्न घेत असून अजूनही त्यांचे उत्पन्न वाढत आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीने आधार दिला असून बरेच शेतकरी उत्पन्न घेऊन समाधान व्यक्त करीत आहेत. त्यापैकी महारी बु. चे प्रगतशील शेतकरी मेहबुब शेख, बोराळाचे सुनिल मोरे, शिवाजी नायक इत्यादी शेतकऱ्यांनी उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे, पि.ए.चव्हाण, रमेश भवर, शिलवंत इंगोले, रंगनाथ जांबुतकर उपस्थित होते.

            रेशीम उद्योगामध्ये मनरेगा तसेच नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना या दोन योजना असून मनरेगातून 33 वर्षामध्ये एकूण 03 लाख 26 हजार रुपये इतकी रक्कम कुशल-अकुशलच्या स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्यांना प्रती एकरी दिली जाते. यामध्ये तुती नर्सरी तसेच किटक संगोपनगृह सर्व असून या शेतीपूरक व्यवसायाची नोंद प्रत्येक शेतकऱ्यांने करुन स्वत:चे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सध्या जिल्ह्यात दि. 25 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत महारेशीम अभियान चालू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी दि. 15 फेब्रुवारी, 2021 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केले आहे.

*****

छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया फेब्रुवारी अखेर पर्यंत पार पाडण्याचे नियोजन

 

 

           हिंगोली, दि. 04 : लक्षित गटातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक एम.फिल. व पीएचडी करणाऱ्या उमेदवारांसाठी आर्थिक सहायक देण्यासाठी सारथीमार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) करिता राज्यातील विविध प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार एकूण 342 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

            छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) च्या प्राप्त अर्जाची छाननी केली अनेक उमेदवारांनी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे जोडली नसल्याने किंवा कागदपत्रात त्रुटी असल्याने असे अर्ज त्रुटी पूर्तता करण्यासाठी त्रुटी पूर्तता यादी दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी सारथी संकेतस्थळ www.maharashtra.gov.in-noticeboard वर प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 23 डिसेंबर, 2020 ते       20 जानेवारी, 2021 या कालावधीमध्ये आक्षेप मागविण्यात आले होते. आक्षेपाच्या त्रुटी  पूर्ततेनंतर पात्र झालेल्या एकूण 241 उमेदवारांना मुलाखलतीस सारथी पुणे येथे बोलावले जाणार आहे.

            वरील पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया माहे फेब्रुवारी, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पार पाडण्याचे नियोजन आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ), पुणे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

*****

02 February, 2021

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती

 


हिंगोली, दि. 02 (जिमाका) : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षासोबत पंधरवाडा साजरा करण्यात येतो.

मोटार वाहन अधिनियम-1988 च्या कलम 129 मध्ये नमूद केल्यानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. तसेच वेळोवेळी मा. उच्च न्यायालय, मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याचा निर्णय दिला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी जे दुचाकी वाहनाचा वापर करतात. त्यांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 अन्वये वाहन चालवित असतांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे. या आदेशानंतर शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास तो अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. याचे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे .

हिंगोली  शहर व जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे आदेश          दि. 1 फेब्रुवारी, 2021 पासून लागू राहतील. 

                                                                        ******

वाहतूक नियमांचे पालन करावे - अरुण सुर्यवंशी

 



·   उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण.

 

           हिंगोली,दि.02: वाहतूक नियमांची माहिती असुनही अनेक नागरिक वाहतूक नियमाचे पालन करत नाहीत. परिणामी रस्ते अपघातात अनेकाचे मृत्यू होतात. याकरीता सर्व नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले.

            येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 32 व्या रस्ता सुरुक्षा अभियानातंर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. सुर्यवंशी हे बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक व्ही.जी.कळंबकर, एस.एम.कंदकुर्तीकर, जगदिश माने, शैलेशकुमार कोपुल्ला, श्रीमती कलपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी श्री. सुर्यवंशी म्हणाले की, निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने एकापेक्षा जास्त प्राणांतिक अपघात होतात. त्यामुळे मृत्यू होणारा व्यक्ती आणि त्याच्या कुटूंबातील सदस्यांवर खुप मोठा परिणाम होतो. कुटूंबातील कर्ता  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटूंब उध्वस्त होतात.  रस्ते अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक समस्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. अपरिपक्व तरुण, व्यसनाधीन चालक आणि वाहन निष्काळजीपणे हाताळणाऱ्या बेजवाबदार वृत्तीची माणसे यांचा वाहन अपघातांचे प्रमाण वाढण्यात मोठा वाटा आहे. उपाय सोपे आहेत. आपण तो प्रत्यक्षात आणला तरच त्याचे चांगले परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहन चालकाने साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन केले तर वाहनांमुळे होणारे अपघात, त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक यातना व हानी बऱ्याच अंशी कमी करता येतील. शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना याबाबत स्वतंत्र वाहतूक रस्ता सुरक्षा व नियमाची माहिती करुन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

             32 व्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या सुरक्षा सप्ताहात महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबीर, वाहतूक नियमाचे जनजागृती करण्यात येत असल्यचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यावेळी म्हणाले.

            सुरक्षा सप्ताहानिमित्त उपस्थितांना रस्ता सुरक्षे शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

            यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दिपक कोमुलवार, गजानन बंदुके, शैलेश कानेड, श्रीमती चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

*****