02 February, 2021

वाहतूक नियमांचे पालन करावे - अरुण सुर्यवंशी

 



·   उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण.

 

           हिंगोली,दि.02: वाहतूक नियमांची माहिती असुनही अनेक नागरिक वाहतूक नियमाचे पालन करत नाहीत. परिणामी रस्ते अपघातात अनेकाचे मृत्यू होतात. याकरीता सर्व नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले.

            येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 32 व्या रस्ता सुरुक्षा अभियानातंर्गत आयोजित कार्यक्रमात श्री. सुर्यवंशी हे बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक व्ही.जी.कळंबकर, एस.एम.कंदकुर्तीकर, जगदिश माने, शैलेशकुमार कोपुल्ला, श्रीमती कलपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी श्री. सुर्यवंशी म्हणाले की, निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने एकापेक्षा जास्त प्राणांतिक अपघात होतात. त्यामुळे मृत्यू होणारा व्यक्ती आणि त्याच्या कुटूंबातील सदस्यांवर खुप मोठा परिणाम होतो. कुटूंबातील कर्ता  व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटूंब उध्वस्त होतात.  रस्ते अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक समस्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. अपरिपक्व तरुण, व्यसनाधीन चालक आणि वाहन निष्काळजीपणे हाताळणाऱ्या बेजवाबदार वृत्तीची माणसे यांचा वाहन अपघातांचे प्रमाण वाढण्यात मोठा वाटा आहे. उपाय सोपे आहेत. आपण तो प्रत्यक्षात आणला तरच त्याचे चांगले परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहन चालकाने साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन केले तर वाहनांमुळे होणारे अपघात, त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक यातना व हानी बऱ्याच अंशी कमी करता येतील. शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना याबाबत स्वतंत्र वाहतूक रस्ता सुरक्षा व नियमाची माहिती करुन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

             32 व्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या सुरक्षा सप्ताहात महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबीर, वाहतूक नियमाचे जनजागृती करण्यात येत असल्यचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यावेळी म्हणाले.

            सुरक्षा सप्ताहानिमित्त उपस्थितांना रस्ता सुरक्षे शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

            यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दिपक कोमुलवार, गजानन बंदुके, शैलेश कानेड, श्रीमती चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

*****

No comments: