हिंगोली, (जिमाका) दि. 24
: राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्हिड-१९ बाधित रुग्णांमध्ये
दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक
उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार तसेच जिल्ह्यात
येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाणारे प्रवासी यांची अँटीजेन तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.
यासाठी आरोग्य
विभागामार्फत यापूर्वी आस्थापना मालक, दुकानदार यांच्या अँटीजेन तपासण्यासाठी
उभारण्यात आलेल्या कॅम्प प्रमाणे यावेळी देखील जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक,
दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कमर्चारी यांच्या कोरोना अँटीजेन तपासण्या
करण्यासाठी कॅम्प उभारुन तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी आरोग्य विभागाने उपविभागीय
अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांच्याशी समन्वय साधावा.
तसेच जिल्ह्यात
येणारे व जिल्ह्यातून बाहेर जाणारे प्रवाशी यांची देखील कोरोनाच्या अनुषंगाने अँटीजेन
तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर प्रवासी व
खाजगी वाहतूकीतून प्रवास करणारे प्रवाशी यांच्यासाठी एका रस्त्यावर 02 कॅम्प
उभारावेत. 02 कॅम्प मध्ये किमान एक किमी अंतर असावे. यानुसार जिल्ह्यातून बाहेर
जाणारे व जिल्ह्यात येणारे प्रवाशी यांच्या अँटीजेन तपासण्या करण्यात याव्यात. यासाठी
आरोग्य विभागाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांच्याशी
समन्वय साधावा.
यानुसार
वरीलप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकानदार, प्रवासी यांच्या अँटीजेन
तपासण्या करण्यात याव्यात. यामध्ये जे नागरिक कोरोना बाधित आढळतील अशांना
कोरोनाच्या अनुषंगाने उपचारासाठी पुढील कार्यवाही करण्यात यावी.
या आदेशाची आवज्ञा
करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस
पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन
कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020
अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद
केले आहे.
या आदेशाची
सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली,
पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी
नगर पंचायत-नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची
असेल.
******
No comments:
Post a Comment