15 February, 2021

राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी एकुण 58.32 कोटी अतिरिक्त निधी मंजूर

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 15: हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2021-22 या अर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 101 कोटी 68 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होताया आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. औरंगाबाद येथे आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 322 कोटी 28 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 58.32 कोटी (57.36 टक्के) अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 160 कोटी रुपयांचा  झाला असून त्यास वित्त व नियोनज मंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेत आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक संपन्न झाली. या बैठकीस पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, सर्वश्री आमदार राजू नवघरे, सतिष चव्हाण, विक्रम काळे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव एन.आर. गद्रे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. औंढा नागनाथ आणि सिध्देश्वर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी आवश्यक अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले. यावेळी आमदार राजू नवघरे यांनी सिध्देश्वर कँम्प पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली.

तसेच बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी कोविड-19 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हिंगोली जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती निधी मधून कोविड-19 करीता भौतिक पायाभूत उत्कृष्ट सोयीसुविधा, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, वन पर्यटन आदी उत्कृष्ट कामे केल्याबद्दल 58.32 कोटी अतिरिक्त निधी वाढवून देत असल्याचे सांगून सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती

****

No comments: