हिंगोली,
(जिमाका) दि. 22 : शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण केल्यानंतर
मालाची विक्री करण्यासाठी खूप वेळ लागतो हा गैरसमज दूर करुन शेतकऱ्यांनी हळद पिकासाठी सेंद्रीय शेतीचे
प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पुणे येथील नोकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
संजय देशमुख यांनी केले.
कृषी विज्ञान
केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने
"स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रीय हळद शेतीचे प्रमाणीकरण"
या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन
करताना श्री. देशमुख म्हणाले, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी 3
वर्षाचा कालावधी लागतो. मात्र चांगल्या पद्धतीने सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यास
दोन वर्षांनी सुद्धा प्रमाणीकरण करता येऊ शकते. सेंद्रीय शेतीची नोंदणी
केल्याबरोबर "सर्टिफाइड ऑरगॅनिक ग्रेड-1" असे लेबल लावून त्याचप्रमाणे
प्रमाणीकरण संस्थेचा लोगो लावून मालाची विक्री करण्यास सुरुवात करता येते. दुसऱ्या
आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा याचप्रकारे ग्रेड-2 आणि ग्रेड-3 लिहून विक्री करता येते.
प्रमाणीकरण झाल्यानंतर इंडिया ऑरगॅनिक हा लोगो लावून मालाची विक्री करता येते, अशी
माहिती दिली.
या
कार्यक्रमामध्ये बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ. पी.
पी. शेळके यांनी देशातील हळदीचे निर्यातदार हे सेंद्रीय हळदीची मागणी करत असून
त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीचे प्रमाणीकरण करण्याची
प्रक्रिया शक्य तितक्या लवकर करावी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तीक स्वरुपात
शेतजमिनीचे प्रमाणीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी वार्षिक सुमारे 15 हजार रुपये
खर्च येतो आणि त्यासाठी पुणे येथील नॅचरल ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी (NOKA) यांची मदत घेता येईल. लहान
शेतकऱ्यांसाठी गटाने नोंदणी करणे शक्य असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक
कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास 200 शेतकऱ्यांसाठी वार्षिक सुमारे 40 हजार रुपये खर्च होईल. या पद्धतीने सुद्धा
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा म्हणजे भविष्यात त्यांना आपल्या हळदीपासून
निर्यातीद्वारे अधिक दाम मिळू शकेल. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक
कंपन्या आणि हळदीचे मोठे शेतकरी यांनी नोंदणीसाठी पुढे यावे तसेच कृषी विज्ञान
केंद्राच्या माध्यमातून ही नोंदणी करावी म्हणजे भविष्यात निर्यातीसाठी चांगली संधी
प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ.
पी. पी. शेळके यांनी केले.
या कार्यक्रमाचे
संचलन प्रा. अनिल ओळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन किसानचे दीपक खेमलापुरे यांनी
केले.
******
No comments:
Post a Comment