16 February, 2021

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन

 


·  जिल्ह्यात 1 ते 8 मार्च दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार

हिंगोली,(जिमाका)दि.16: लहान मुलांमध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होत असतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात. तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. 68 टक्के बालकांना आतड्याचा जंत दोष मातीतील जंतामुळे होतो.

बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनामार्फत आरोग्य विभागाकडून 1 ते 8 मार्च दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत मूळ 1 ते 6 वयोगटातील सर्व मुले व 6 ते 19 वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. या उपक्रमात जिल्ह्यातील 3 लाख 48 हजार 069 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा संपन्न्‍ झाली. यावेळी बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक राजेंद्र सुर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे यांच्यासह तालूका आरोग्य अधिकारी आदींची उपस्थिती होती.

****

 

 

 

No comments: