02 June, 2021

कोविड-19 मुळे हिंगोली जिल्ह्यात 40 बालकांचे पालकत्व हिरावले

 



·   अनाथ व निराधार बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल सक्षम

हिंगोली,(जिमाका)दि.2: कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 40 बालकांचे पालकत्व हिरावले असुन यामध्ये 31 जणांनी वडील, 8 जणांनी आई तर एका बालकांने आई आणि वडील दोघेही गमावले असून या बालकांचे योग्य बाल संगोपनासाठी विशेष काळजी घेत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी आज कोविड-19 मुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत सादर केली.

कोविड-19 मुळे जिल्ह्यातील पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, बाल कल्याण समिती सदस्या ॲड. वैशाली देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती किसनराव कोरडे आणि जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या पथकाद्वारे पालकत्व गमावलेल्या 40 बालकांचा शोध घेतल्याचे सांगितले. ही सर्व बालके आपले काका-काकू, मामा-मामी आणि आजी-आजोबांकडे सध्या वास्तव्यास आहेत. भविष्यात या बालकांचे नातेवाईक आपल्या जवळ ठेवण्यास तयार नसल्यास त्यांना बाल संगोपनगृहात ठेवून त्यांचे संगोपन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी आपले पालकत्व गमावले आहे. यात एक पालक गमावलेले आणि दोन्ही पालक गमावलेले, तसेच ज्या बालकांनी कोरोना शिवाय इतर कारणांमुळे आपले पालकत्व गमावले असतील त्यांचीही माहिती संकलीत करावी. तसेच सदर माहिती दैनंदिन पोर्टलवर अद्ययावत करावी. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील त्यांचे बाल संगोपन योजनेतून संगोपन करावे. तसेच ज्या बालकांचे एकच पालक आहे आणि त्यांचे पालक विलगीकरण किंवा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल आहेत अशा बालकांची माहिती दररोज जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडुन प्राप्त करुन घ्यावी. तसेच सदर बालकांचे त्या कालावधीसाठी संगोपन करावे. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांना पोलिस विभागाने संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. तसेच त्यांचे शोषण होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी.

कोरानाचा धोका लक्षात घेवून बाल सुधार गृहातील किरकोळ गुन्ह्यातील मुलांना त्यांच्या घरी पाठवावे. तसेच जिल्ह्यातील बालगृह, बाल सुधार गृह आणि वसतीगृहातील सर्व बालकांची तसेच तेथील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु होताच बालगृह, बाल सुधार गृह आणि वसतीगृहातील सर्व बालकांचे लसीकरण करावे. तसेच जिल्ह्यात बालगृह सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. कोरोनामुळे मागील एक वर्षाहून अधिक काळ नागरिक आपापल्या घरातच वास्तव्यास आहेत आणि यामुळे कौटूंबिक हिंसाचार वाढल्याने महिला-मुलांवर अत्याचार झाल्याचे वृत्त अनेकदा वृत्तपत्रातून निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडु नये याकरिता पोलिसांनी जिल्ह्यातील गावा-गावात जनजागृती करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात पालकत्व गमावलेले बालके निदर्शनास आल्यास त्याची माहिती तसेच लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या हेल्‍पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.

****

01 June, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 30 रुग्ण ; तर 56 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 290 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णाचा मृत्यू

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : जिल्ह्यात 30 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 16 व्यक्ती, कळमनुरी परिसर 07 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती व औंढा परिसर 03 व्यक्ती असे एकूण 30 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 56 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी  110 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 16 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 126 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 710 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 57  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 290  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 363 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

**** 

गावपातळीवर हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन

 


 

        हिंगोली, (जिमाका) दि. 1 :  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून 2021 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजारांविषयी (डेंग्यू, चिकुनगुनिया, जे.ई. चंडीपुरा व हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्यांचा प्रतिरोध उपाय योजनांच्या  अंमलबजावणीमध्ये सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना  पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनाची माहिती योग्य त्या माध्यमांद्वारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनांमध्ये लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख  उद्देश आहे.

            यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक  सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणांसाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, ग्रामीण आरोग्य, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा  धडक कार्यक्रम, आरोग्य  स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण करणे. तसेच एक दिवस कोरडा पाळणे या विषयी जनतेमध्ये जनजागृती  करणे या बाबीचा समावेश आहे.

            जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेवून गावपातळीवर हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे .

 

*******

जागतिक दूध दिवसानिमित्त ऑनलाईन वेबिनार संपन्न मराठवाडा क्षेत्रात दूध उत्पादन वाढीसाठी काम करण्याची आवश्यकता -- डॉ. सी.डी. खेडकर

 


हिंगोली, (जिमाका) दि. 01 : मागील सुमारे 21 वर्षांपासून भारत हा संपूर्ण जगात दुध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मात्र मराठवाड्याचा विचार केला असता कोल्हापूर आणि  अहमदनगर जिल्ह्यामधील एका तालुक्यात जेवढे  दुग्ध उत्पादन होते. सुमारे तेवढेच उत्पादन संपूर्ण मराठवाडा क्षेत्रात होते.  या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र आणि  शेतकरी  बांधवांनी दूध उत्पादन वाढीसाठी काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पुसद येथील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ सी.डी.खेडकर यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि शेकरु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक दुग्ध व्यवसाय आणि मूल्यवर्धित दुग्धपदार्थ निर्मिती या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सी. डी. खेडकर बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. खेडकर म्हणाले, आपल्या देशामध्ये 1990 मध्ये  सुमारे 170 ग्रॅम प्रति दिवस दुधाची उपलब्धता प्रतिमाणशी होती. त्या मानाने आता 2017 ची आकडेवारी बघितली असता 390 ग्रॅम प्रति दिवस प्रति व्यक्ती एवढी उपलब्धता झाली आहे, ही चांगली प्रगती आहे.  मराठवाड्याचे भूषण असलेली देवणी जात आणि त्याच प्रमाणे लाल कंधारी जातीच्या पशुधनावर सुद्धा डॉ. खेडकर यांनी माहिती दिली. काही शेतकऱ्यांनी आपल्या गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण वाढवण्याचा संदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावर डॉ. खेडकर यांनी बऱ्याच वेळा सोयाबीनच्या हंगाम करत असताना पाऊस येतो आणि फार मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खराब होते,  असे खराब झालेले सोयाबीन मार्केटमध्ये त्याला अतिशय कमी भावात विकावे लागते त्या ऐवजी त्या सोयाबीनचा वापर पशुधनाला व्यवस्थितपणे वापर केल्यास फॅट वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. त्यासाठी खराब झालेले सोयाबीन भरडून आणि उकळून  जर जनावरांना दररोज प्रमाणशीर खाऊ घातले तर फॅट वाढण्यासाठी चांगली मदत होईल.  कारण सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फॅट्स यांचे भरपूर प्रमाण असते आणि ही  खराब झालेली सोयाबीन ढेपी  पेक्षाही स्वस्त किमतीत विकावे लागते. त्या ऐवजी शेतकऱ्यांनी  पर्याय म्हणून सोयाबीनचा वापर केल्यास त्यांना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे, असे डॉ.  खेडकर यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा प्रसाराकरिता अनेक योजना चालू असून त्या संदर्भात दूध व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी साठी पंचायत समितीमधून माहिती घेऊन ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे सुद्धा त्यांनी सूचित केले.

 गाईच्या तुपाला मोठ्या शहरांमध्ये अगदी अडीच हजार रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळत असून त्याची क्वालिटी जपणे मात्र गरजेचे असल्याचे डॉ. खेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच मिस्टी दही म्हणजे गोड दही तयार करण्याची पद्धत, खवा,  पनीर,  दही बनवण्याची पद्धत व पनीर  बनवण्यासाठी लागणारे पनीर प्रेस कसे वापरावे यासंबंधीची माहिती सुद्धा दिली.  सर्व प्रेक्षकांना त्यांनी जागतिक दूध दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात कधीही अडचणी आल्यास त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी सूचना केली. 

प्रास्ताविकपर मार्गदर्शनात तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात येणारे प्रयत्न यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे जवळजवळ 84 गीर गाईंचे गोपालन केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचा सहभाग घेण्यात आला आहे.  हे केंद्र परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालन शेकरु टीव्हीचे श्री. बागल यांनी केले तर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कैलास गिते आणि अनिल ओळंबे  यांनी औपचारिक आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील अनेक दुग्ध व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रसारण युट्युब आणि फेसबुक पेजवरुन सुद्धा करण्यात आले असून त्याचा लाभ ज्या लोकांनी हा कार्यक्रम बघितला नाही त्यांना परत बघण्यासाठी करता येईल, असे आवाहन डॉ. पी पी शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि  प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर  यांनी केले आहे.

*******

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक युवक-युवतींनी वैद्यकीय क्षेत्रात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करावा

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कोविड-19  ने जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील विद्यमान आरोग्य यंत्रणा अभूतपूर्व तणावात आणली आहे. तसेच विद्यमान आरोग्य सुविधांमध्ये पुरेसे आरोग्य तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचा शासनाचा मानस आहे. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील युवक-युवतींना वैद्यकीय क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार द्वारे 3.0 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या (PMKVY) केंद्रीय घटकाअंतर्गत पुढील सहा  विषयांमध्ये रुग्ण सेवेच्या आवश्यकते प्रमाणे क्रॅश कोर्सेसची सुरुवात करण्यात येत आहे.

उपलब्ध कोर्सेसचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

1. EMERGENCY MEDICAL TECHNICIAN –BASIC , 2. GENERAL DUTY ASSISTANT (GDA), 3. GDA-ADVANCED (CRITICAL CARE), 4. HOME HEALTH AIDE , 5. MEDICAL EQUIPMENT TECHNLOGY ASSISTANT, 6. PHELOBOTOMIST तसेच या कोर्सेस मध्ये MEDICAL RECORD ASSSISTANT याचाही समावेश केलेला आहे.

ज्यांना वरील पैकी कोणतेही एक कोर्से निवडून प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्यांनी https://skillindia.nsdcindia.org या स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी.

या कोर्सेसच्या अंतर्गत प्रशिक्षण हे जास्तीत जास्त एक महिना  नोकरी सुरु  असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालय किंवा इतर रुग्णालयात होऊ शकते. सदर उमेदवारांचे कौशल प्रशिक्षण संबंधित रुग्णालयाअंतर्गत उत्तम प्रकारे पूर्ण होईल. या सुविधेचा फायदा उचलण्याची मोठी संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा. तसेच  अधिक माहितीसाठी  02456-224574 / 9970125039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सो.खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केलेले आहे.

******

‘राज्याचा कौशल्य विकास विभाग’ पुरविणार प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्‍यबळ जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी मागणी नोंदवावी

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून ही बाब लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्यामाध्यमातून मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयातील खाजगी व सरकारी रुग्णालयांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी नोंदवावी लागणार आहे. यानुसार जिल्हयातील सर्व सरकारी रुग्णालये व 20 खाटांपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्राशी संबधित रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या बाबीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देता येणार आहे.

राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत General Duty Assistant, General Duty Assistant Advanced, Medical Records Assistant, Phlebotomist, तसेच आयुषशी संबधित उदा.  Panchakarma Technician, Ayurveda Dietician, Yoga Wellness Trainer Ambulance Driver सारखे एकूण 37 र्कोसेसद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ जिल्ह्यातील रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे.

जिल्ह्यातील ज्या खाजगी व शासकीय रुग्णालयांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे व मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जे रुग्णालय(OJT-RPL) मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक असतील अशा रुग्णालयांनी  https://tinyurl.com/2cjfnx4s  या लिंकवर मागणी नमूद करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सुमीत पोटे यांच्याशी 9970125039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

******

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षा चालकांना जीवनावश्यक कीटचे वाटप

 




हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नांदेड नाका चौकात रिक्षा चालकांना जीवनाश्यक कीटचे वितरण सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ॲटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना व सामान्यत: विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराचे माहितीपत्रकही यावेळी वितरीत करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी  जास्तीत जास्त ॲटो रिक्षा चालकांनी सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ॲटो रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****