हिंगोली, (जिमाका) दि. 01 : मागील सुमारे 21 वर्षांपासून भारत हा संपूर्ण जगात दुध
उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मात्र मराठवाड्याचा विचार केला असता
कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामधील एका तालुक्यात जेवढे
दुग्ध उत्पादन होते. सुमारे तेवढेच उत्पादन संपूर्ण मराठवाडा क्षेत्रात होते.
या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी बांधवांनी दूध उत्पादन वाढीसाठी काम करण्याची
आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला येथील डॉक्टर
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पुसद येथील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय येथील
प्राध्यापक डॉ सी.डी.खेडकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि शेकरु
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक दुग्ध व्यवसाय आणि मूल्यवर्धित
दुग्धपदार्थ निर्मिती या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
मार्गदर्शन करताना डॉ. सी. डी. खेडकर बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. खेडकर म्हणाले, आपल्या
देशामध्ये 1990 मध्ये सुमारे 170 ग्रॅम प्रति दिवस दुधाची उपलब्धता
प्रतिमाणशी होती. त्या मानाने आता 2017 ची आकडेवारी बघितली असता 390 ग्रॅम प्रति
दिवस प्रति व्यक्ती एवढी उपलब्धता झाली आहे, ही चांगली प्रगती आहे. मराठवाड्याचे
भूषण असलेली देवणी जात आणि त्याच प्रमाणे लाल कंधारी जातीच्या पशुधनावर सुद्धा डॉ.
खेडकर यांनी माहिती दिली. काही शेतकऱ्यांनी आपल्या गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये
फॅटचे प्रमाण वाढवण्याचा संदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात प्रश्न
विचारले. त्यावर डॉ. खेडकर यांनी बऱ्याच वेळा सोयाबीनच्या हंगाम करत असताना पाऊस
येतो आणि फार मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खराब होते, असे खराब झालेले सोयाबीन मार्केटमध्ये त्याला
अतिशय कमी भावात विकावे लागते त्या ऐवजी त्या सोयाबीनचा वापर पशुधनाला
व्यवस्थितपणे वापर केल्यास फॅट वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. त्यासाठी खराब झालेले
सोयाबीन भरडून आणि उकळून जर जनावरांना दररोज प्रमाणशीर खाऊ घातले तर फॅट
वाढण्यासाठी चांगली मदत होईल. कारण सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फॅट्स यांचे
भरपूर प्रमाण असते आणि ही खराब झालेली सोयाबीन ढेपी
पेक्षाही स्वस्त किमतीत विकावे लागते. त्या ऐवजी शेतकऱ्यांनी
पर्याय म्हणून सोयाबीनचा वापर केल्यास त्यांना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे, असे
डॉ.
खेडकर यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा प्रसाराकरिता
अनेक योजना चालू असून त्या संदर्भात दूध व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी साठी
पंचायत समितीमधून माहिती घेऊन ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे सुद्धा त्यांनी
सूचित केले.
गाईच्या
तुपाला मोठ्या शहरांमध्ये अगदी अडीच हजार रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळत असून
त्याची क्वालिटी जपणे मात्र गरजेचे असल्याचे डॉ. खेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच मिस्टी दही म्हणजे गोड दही तयार करण्याची पद्धत, खवा,
पनीर,
दही बनवण्याची पद्धत व पनीर बनवण्यासाठी लागणारे पनीर प्रेस कसे वापरावे
यासंबंधीची माहिती सुद्धा दिली. सर्व प्रेक्षकांना त्यांनी जागतिक दूध
दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात कधीही अडचणी आल्यास त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी
सूचना केली.
प्रास्ताविकपर मार्गदर्शनात तोंडापूर कृषी
विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. शेळके यांनी हिंगोली जिल्ह्यातील
दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात येणारे
प्रयत्न यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर
येथे जवळजवळ 84 गीर गाईंचे गोपालन केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये कयाधू
शेतकरी उत्पादक कंपनीचा सहभाग घेण्यात आला आहे. हे केंद्र परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत
असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन शेकरु टीव्हीचे श्री.
बागल यांनी केले तर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कैलास गिते आणि अनिल ओळंबे
यांनी औपचारिक आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील अनेक दुग्ध व्यावसायिक
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रसारण युट्युब आणि फेसबुक पेजवरुन सुद्धा करण्यात
आले असून त्याचा लाभ ज्या लोकांनी हा कार्यक्रम बघितला नाही त्यांना परत
बघण्यासाठी करता येईल, असे आवाहन डॉ. पी पी शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment