17 June, 2021

 

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी

आपला नजीकच्या कालावधीतील रंगीत छायाचित्र आठ दिवसांत जमा करावे

                                                     -- उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात दिनांक: 01.01.2021 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार याद्यांच्या सततच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुद्धीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र जमा करणे, दुबार नावे वगळणे, लॉजिकल इरर दूर करणे आदी कामे सुरु आहेत. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत त्यांचे फोटो गोळा करुन मतदार यादीत अद्यावत करणे किंवा सदरचे मतदार सदरच्या पत्त्यावर राहत नसल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित पध्दतीचा अवलंब करुन संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणी करण्याच्या सूचना मा. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत.

            सद्य:स्थितीत हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 लाख 24 हजार 935 इतके मतदार असून 12 हजार 358 इतक्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत. त्यापैकी 494 मतदारांचे फोटो मतदार यादीत अद्यावत झाले आहेत. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचा विधासभा मतदारसंघनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            92- वसमत विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या 2 लाख 99 हजार 802 इतकी असून मतदार यादीत छायाचित्रे नसलेल्या मतदारांची संख्या 407 इतकी आहे. यापैकी 290 मतदारांचे मतदार यादीतील छायाचित्रे अद्यावत करण्यात आली आहेत. उर्वरित 117 मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अद्यावत होणे बाकी आहे.  

            93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या 3 लाख 11 हजार 83 इतकी असून मतदार यादीत छायाचित्रे नसलेल्या मतदारांची संख्या 3 हजार 936 इतकी आहे. यापैकी 28 मतदारांचे मतदार यादीतील छायाचित्रे अद्यावत करण्यात आली आहेत. उर्वरित 3 हजार 908 मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अद्यावत होणे बाकी आहे. 

            94-हिंगोली विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या 3 लाख 14 हजार 50 इतकी असून मतदार यादीत छायाचित्रे नसलेल्या मतदारांची संख्या 8 हजार 15 इतकी आहे. यापैकी 176 मतदारांचे मतदार यादीतील छायाचित्रे अद्यावत करण्यात आली आहेत. उर्वरित 7 हजार 839 मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अद्यावत होणे बाकी आहे. 

            मतदार यादीत नाव आहे मात्र छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपला नजीकच्या कालावधीतील रंगीत छायाचित्र पुढील आठ दिवसांत आपल्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात छायाचित्र जमा करावेत. ज्या मतदारांचे छायाचित्र प्राप्त होणार नाहीत अशा मतदारांची नावे मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरुन विहित पध्दतीचा अवलंब करुन मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल.

            हा कार्यक्रम कालमर्यादित स्वरुपाचा असल्याने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात नजीकच्या कालावधीतील रंगीत छायाचित्र जमा करुन मतदार यादी शुध्दीकरण कामी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली  यांनी  केले आहे.

****

 

No comments: