हिंगोली,(जिमाका)दि. 16 : जिल्ह्यातील जास्तीत-जास्त
क्षेत्रावर बांबूची लागवड करुन बांबू लागवड मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बांबू लागवडीला चालना मिळावी या
उद्देशाने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कमलाकर फड, जिपचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी पोहरे तसेच प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक पाशा पटेल आणि संजीव करपे यांची उपस्थिती
होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी पुढे म्हणाले की, जिल्ह्याला मोठ्या लांबीचा नदी किनारा लाभला आहे. या
नदीकाठच्या गावांमध्ये नदी-नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करण्यासाठी शेती
व्यतिरिक्त मोठी संधी आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास
मदत होणार आहे. तसेच नदीच्या काठावर बांबूची लागवड केल्यास संभाव्य येणाऱ्या
पुरांपासून शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होण्यापासून बचाव देखील होण्यास मदत होणार
आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त म्हणजे 6 टक्के क्षेत्र हे हिंगोली जिल्ह्यात
वनीकरणाखाली आहे. जिल्ह्यात 33 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रत्येक विभागाने मोहिम म्हणून ‘बांबू लागवड’ अभियान राबवावे. यासाठी
शासन पोखरा व रोहयोच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे. या योजनेचा फायदा घेऊन
जिल्ह्यात जास्तीत-जास्त क्षेत्रावर बांबूची लागवड होण्यासाठी शेतकऱ्यांना
प्रवृत्त करावे. विशेषत: वन विभागाच्या उपलब्ध असलेल्या जमिनीवर बांबुची लागवड
करण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक कार्यालयाने बांबूचे
फर्निचर खरेदी करुन या उद्योगाला चालना द्यावी. तसेच ही बांबू लागवड मोहिम सर्वांच्या
सहभागाने जिल्ह्यात नक्कीच यशस्वी करता येईल, असे ही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी
म्हणाले.
प्रमुख मार्गदर्शक पाशा पटेल म्हणाले की, आधुनिकीकरणांच्या नावांखाली देशात
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे
भविष्यात वादळ, महापूर असे प्रश्न उदभवणार
आहेत. मनुष्याला भविष्यात जगायचे असेल तर बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यापासून ऑक्सीजन मोठ्या प्रमाणावर मिळते आणि आज कोवीड मुळे जी ऑक्सिजनची
परिस्थिती निर्माण झाली आहे ती भविष्यात होणार नाही. या बांबू लागवडीमुळे जास्तीत-जास्त
प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. तसेच बांबू लागवड ही कमी खर्चात होणार असून
बांबू उद्योगातून शेतकऱ्यांचे अर्थचक्र बदलणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होवू शकतो. बांबू
लागवडीसाठी शेतकऱ्यांना ही एक मोठी संधी आहे. यासाठी बांबू लागवड चळवळीत जास्तीत-जास्त
शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन बांबू लागवड करावी. शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रवृत्त
करुन या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी, असे आवाहन पाशा पटेल
यांनी यावेळी केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना संजीव करपे यांनी बांबू लागवडीमुळे
शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ होऊ शकतो. सध्याच्या कोरोना काळात
ऑक्सीजनची जी कमतरता भासत
आहे, ती बांबू लागवडीपासून कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच वातावरणाचा समतोल
राखण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. यासाठी
शासनाच्या विविध योजना असून शेतकरी बांधवांनी त्या योजनाचाही फायदा घ्यावा, असे
सांगुन श्री. करपे यांनी बांबूपासून तयार होणारे विविध प्रकारचे फर्निचर, रिसॉर्ट,
खाद्य पदार्थ आदी साहित्याची माहिती प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे दिली.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी,
तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच सरपंच,
तलाठी, ग्रामसवेक यांची ऑनलाईन उपस्थिती
होती.
****
No comments:
Post a Comment