· अनाथ व निराधार बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल सक्षम
हिंगोली,(जिमाका)दि.2: कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 40 बालकांचे पालकत्व हिरावले असुन यामध्ये
31 जणांनी वडील, 8 जणांनी आई तर एका बालकांने आई आणि वडील दोघेही गमावले असून या
बालकांचे योग्य बाल संगोपनासाठी विशेष काळजी घेत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी आज कोविड-19 मुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची
काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत
सादर केली.
कोविड-19 मुळे जिल्ह्यातील पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व
सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी
पवार, बाल कल्याण समिती सदस्या ॲड. वैशाली देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
श्रीमती सरस्वती किसनराव कोरडे आणि जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे
यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी
जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या पथकाद्वारे पालकत्व गमावलेल्या 40 बालकांचा शोध
घेतल्याचे सांगितले. ही सर्व बालके आपले काका-काकू, मामा-मामी आणि आजी-आजोबांकडे सध्या
वास्तव्यास आहेत. भविष्यात या बालकांचे नातेवाईक आपल्या जवळ ठेवण्यास तयार नसल्यास
त्यांना बाल संगोपनगृहात ठेवून त्यांचे संगोपन करण्यात येईल, अशी माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, कोरोनामुळे अनेक
बालकांनी आपले पालकत्व गमावले आहे. यात एक पालक गमावलेले आणि दोन्ही पालक
गमावलेले, तसेच ज्या बालकांनी कोरोना शिवाय इतर कारणांमुळे आपले पालकत्व गमावले
असतील त्यांचीही माहिती संकलीत करावी. तसेच सदर माहिती दैनंदिन पोर्टलवर अद्ययावत
करावी. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील त्यांचे बाल संगोपन योजनेतून
संगोपन करावे. तसेच ज्या बालकांचे एकच पालक आहे आणि त्यांचे पालक विलगीकरण किंवा
रुग्णालयात उपचाराकरीता दाखल आहेत अशा बालकांची माहिती दररोज जिल्हा शल्य चिकित्सक
आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडुन प्राप्त करुन घ्यावी. तसेच सदर बालकांचे त्या
कालावधीसाठी संगोपन करावे. ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा
बालकांना पोलिस विभागाने संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. तसेच त्यांचे शोषण होणार
नाही याची देखील दक्षता घ्यावी.
कोरानाचा धोका लक्षात घेवून बाल सुधार गृहातील किरकोळ गुन्ह्यातील
मुलांना त्यांच्या घरी पाठवावे. तसेच जिल्ह्यातील बालगृह, बाल सुधार गृह आणि
वसतीगृहातील सर्व बालकांची तसेच तेथील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. 18
ते 44 वयोगटातील लसीकरण सुरु होताच बालगृह, बाल सुधार गृह आणि वसतीगृहातील सर्व
बालकांचे लसीकरण करावे. तसेच जिल्ह्यात बालगृह सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर
करावा. कोरोनामुळे मागील एक वर्षाहून अधिक काळ नागरिक आपापल्या घरातच वास्तव्यास
आहेत आणि यामुळे कौटूंबिक हिंसाचार वाढल्याने महिला-मुलांवर अत्याचार झाल्याचे
वृत्त अनेकदा वृत्तपत्रातून निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडु नये याकरिता
पोलिसांनी जिल्ह्यातील गावा-गावात जनजागृती करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात
पालकत्व गमावलेले बालके निदर्शनास आल्यास त्याची माहिती तसेच लहान मुलांवर अन्याय
किंवा अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या
हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी
केले.
****
No comments:
Post a Comment