11 June, 2021

 


‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सरपंचाशी साधला संवाद’

ग्रामभाषेच्या माध्यमातून, वासुदेव, वाघ्या-मुरळी आदी लोककलेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी

                                  - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 

* तिसऱ्या टप्यातील कोरोनाचा शिरकाव गावात होणार नाही यासाठी मेथा ग्रामपंचायत सज्ज असल्याची     सरपंच सारिका आणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली ग्वाही.

* पालकत्व हरवलेल्या दोन लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलल्याचे    मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक.

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातील 19 जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला आणि कोविड संदर्भात त्यांनी करीत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. याप्रसंगी व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या- मुरळी इत्यादी लोककलेच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट गावात येणार की नाही याची वाट न पाहता गावांनी यासंबंधीचा निर्णय घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, सततची सावधानता बाळगत नियमांचे पालन करावे आणि आपली गावे कोरोनामुक्त ठेवावीत, असे आवाहन केले.

यावेळी औंढा तालुक्यातील मेथा येथील सरपंच सारिका आणेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, जिल्हा प्रशासन , आरोग्य विभाग, व्हिआरटी पथक, टास्क फोर्स टीम, गावातील नागरिक यांच्या सहकार्याने एकही रुग्ण आढळला नसल्याचे समाधान व्यक्त करुन कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या सहकार्याने आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तिसऱ्या टप्यातील कोरोनाचा शिरकाव गावात होणार नाही यासाठी मेथा ग्रामपंचायत सज्ज असल्याची ग्वाही सरपंच श्रीमती घाणेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिली.

  पुढे संवाद साधतांना सरपंच सारिका आणेकर म्हणाल्या, गावामध्ये कोरोनाच्या पहिल्या टप्यात 55 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 09 रुग्ण आढळून आले. त्यानुसार योग्य नियोजन करुन सर्व रुग्णांना विलगीकरण करुन गावामध्ये होणारा कोरोनाचा शिरकाव थांबविण्यात आला होता. यामध्ये सर्वात अगोदर गावात स्वच्छता मोहिम राबविली. यात स्वच्छता रविवार हा उपक्रम हाती घेतला.  गुढी पाडव्यानिमित्त ‘‘स्वच्छ माझे घर, सुंदर माझा परिसर’’ हा उपक्रम राबविला. यामुळे रोगराईला आळा बसला. तसेच महिलांचा मुख्य सन असलेल्या संक्रांतीनिमित्त सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता घरातच वानाचा कार्यक्रम आयोजित करुन त्यामध्ये सॅनिटाइझर व मास्क वाटपाची सक्ती करण्यात आली. त्यामुळे महिलांचा मास्क व सॅनिटाइझरचा वापर वाढला. गावातील सार्वजनिक कार्यक्रम व लग्नसमारंभाला 100 टक्के बंदी घालून येथून पुढे होणारे विवाह नोंदणी पध्दतीने करण्याचे आवाहन केले.

गावामध्ये ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती पथकाची (VRT)  तसेच गावातील विविध क्षेत्रातील नामवंत  व्यक्तीची कोविड टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्यात आली. यात प्रामुख्याने गावातील खाजगी डॉक्टरांचा सहभाग वाढविला. गावात धार्मिक व वारकरी संप्रदाय असल्याने मंदिर, मस्जीद, बौध्दविहार बंद करणे हे मोठे आवाहन होते. परंतु टास्क फोर्स कमेटीमध्ये आम्ही संस्थानांचे पदाधिकारी यांना सदस्य म्हणून घेतल्याने ते सहज शक्य झाले. असेही यावेळी संवाद साधतांना सरपंच श्रीमती घाणेकर म्हणाल्या.

गावाबाहेरील व गावातील संशयित व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत 9 खाटांचे 3 रुमचे सुसज्ज असे विलगीकरण कक्ष स्थापन करुन या ठिकाणी आरोग्य सेवक व वार्डनिहाय सदस्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली. गावामध्ये पहिल्या टप्यातील 45 वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये लसीबाबत भिती आणि गैरसमज दूर करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे यांच्याकडे पाठपूरावा करुन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबीर घेतला. यात 45 वयोगटावरील एकूण 560 पैकी 543 लोकांचे यशस्वी लसीकरण करुन 97 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले. तसेच जून 2020 मध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या आई-वडिलांच्या पश्चात पालकत्व हरवलेल्या दोन लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलली असल्याचेही सरपंच श्रीमती आणेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हिडीओ कॉन्फरंस सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिलिंद पोहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, मौजे अंजनवाडा येथील सरपंच श्रीमती यशोदाबाई घोंगडे यांची उपस्थिती होती. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व  आदर्श गाव हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनीही कोविड विषाणूच्या बचावाच्या संदर्भात ग्रामस्तरावरील सरपंचांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची उपस्थिती होती.

*****

 

 

 

No comments: