25 June, 2021

दरमहा ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 


दरमहा ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 

हिंगोली, (जिमाका) दि.25: राज्यातील ज्या 7 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असुन जिल्ह्यात खुप कमी प्रमाणात तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याकरीता सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी, किरकोळ व्यापारी यांनी ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उप विभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर आणि अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात कोरोनाचा नवा विषाणू दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहित नाही. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो काही वेळ आहे त्या कालावधीत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यातील ज्या 7 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे त्यात हिंगोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात दररोज केवळ 200 ते 250 तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटीव्टीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. परंतू ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादूर्भाव वाढल्यास आपणांस पून्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. हे संकट टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली तपासणी करुन लसीकरण करुन घ्यावे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी येणाऱ्या 3 दिवसात आरोग्‍य विभागामार्फत लावण्यात आलेल्या कॅम्पवर जाऊन ॲन्टीजेन व आरटीपीसीआर तपासणी करुन घ्याव्यात. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही केली जाईल, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतू जिल्ह्याला लस उपलब्ध असून देखील लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच 18 वर्षांवरील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु झाले असुन सर्वांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

****

 


No comments: