कवठा येथील कोविड केअर सेंटर ठरतेय
रुग्णांसाठी नवसंजीवनी
हिंगोली जिल्ह्यातील
सेनगाव तालुक्यातील कवठा या गावी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे
बांधकाम नवीनच असून सूसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी एक वर्षापासून प्राथमिक
आरोग्य केंद्र चालू झाले म्हणजे कोरोनाचा प्रादूर्भाव जेंव्हापासून सुरु झाला तेंव्हापासून
येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जवळपासच्या म्हणजेच वीस ते तीस किलोमीटरवरुन
कवठा येथील कोरोना सेंटरमध्ये कोविडचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. याठिकाणच्या उपचार
व सुविधामुळे काही कोरोनाचे रुग्ण तर विदर्भातून देखील येथे उपचारासाठी येतात. ज्यावेळेस
कोरोनाचा प्रभाव जास्त होता. त्यावेळेस रेमडिसीव्हर इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नव्हते.
त्यावेळेस कवठा येथील भरती असलेल्या कोरोना रुग्णांना ते उपलब्ध करुन रुग्णांची विशेष
काळजी घेण्यात आली होती. येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी स्वच्छ पाण्याची
व्यवस्था, दोन वेळेचे संतुलित जेवण, चहा, नाश्ता या सर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्यात
येतात.
डॉक्टरांची
आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम सेंटरवर 24 तास विशेष लक्ष ठेवून बाधित रुग्णांवर उपचाराकरिता
तत्पर असतात. डॉक्टर 3 ते 4 वेळेस राऊंड मारुन प्रत्येक रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष
ठेवतात. या कोरोना केअर सेंटरमध्ये डॉ. बेले, डॉ.अशोक खांडेकर डॉ. महेश लादे, डॉ. जगन
काकडे, डॉ. जफर, डॉ.वर्षा कोकाटे हे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि योगेश राऊत, आश्विनी,
मोनिका, किरण सोनटक्के हा नर्सींग स्टॉफ रात्रंदिवस अथक परिश्रम घेवून रुग्णसेवेचे
काम करत आहे. तर रुग्णांसाठी नाश्ता-जेवणाच्या सुविधेचे काम उत्तम विवेक चोपडे, सुभाष
कोरडे, मिलींद पडघन आणि क्षीरसागर हे करत आहेत.
तसेच रुग्णांना आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे औषधोपचार वेळेवर केले जातात. सर्व
औषधी कोविड केअर सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन ठेवले जातात. विशेष म्हणजे
या भागातील जे काही ग्रामीण रुग्ण आहेत त्यांना सेनगाव, हिंगोली या ठिकाणी जाण्याची
गरज नाही. या कोविड केअर सेंटरचा परिसरातील अनेक नागरिकांना फायदा झाल्याने उपचारांती
बरे होऊन अनेक रुग्ण आपल्या घरी परतले आहेत. या सर्वांचे कवठा परिसरातील ग्रामीण भागातील
रुग्णातर्फे आभार व्यक्त केले जात आहे. यामुळे कवठा येथील कोविड केअर सेंटर हे कोरोना
रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.
--
चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
****
No comments:
Post a Comment