16 June, 2021

 

तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात

बायोमिक्स, ट्रायकोडर्मा व मेटारायझियम जैविक बुरशी उपलब्ध

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचेद्वारे निर्मित बायोमिक्स, ट्रायकोडर्मा आणि मेटारायझियम या जैविक साधनांची तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

बायोमिक्सचा वापर हळद, अद्रक, डाळिंब, मोसंबी, पपई, टरबूज, केळी आणि भाजीपाला पिकांसाठी करता येतो. बायोमिक्स मुळे पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांवर येणारे रोग व किडी यांचा बंदोबस्त चांगला करता येतो. बायोमिक्सचा वापर ड्रेंचिंग (आळवणीसाठी) तसेच फवारणीसाठी  करता येतो. आळवणीसाठी बायोमिक्स प्रती 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम मिसळून आळवणी करावी. त्याचप्रमाणे फवारणीसाठी प्रती 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम वापर करावा. बायोमिक्स सोबत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते अथवा औषधे यांचा वापर करु नये. रासायनिक खते अथवा औषधे यांचा वापर 4-5 दिवसांनी आधी किंवा नंतर करावा.

मेटारायझियम अनायसोपली हे बुरशीजन्य कीडनाशक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कीडनाशक पिकातील निरनिराळ्या मऊ कातडीच्या अळीवर परोपजीवी पद्धतीने वाढ होऊन तिचे अळीवर नियंत्रण करते. यामध्ये हुमणी, हिरवी बोंडअळी, शेंदरी बोंडअळी, पांढरी माशी आणि वाळवी यांचा समावेश आहे. मेटारायझियम अनायसोपली वापरण्याचे प्रमाण आळवणीसाठी 2.5 ते 3 किलो प्रती हेक्टर असावे.

ट्रायकोडर्मा हे बुरशी पिकास झिंक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य मिळवण्यासाठी मदत करते. पिकात जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करते. जमिनीद्वारे व बियाणेद्वारे प्रसारित होणाऱ्या निरनिराळ्या रोगकारक बुरशी व सूत्रकृमीवर परोपजीवी पद्धतीने वाढून त्याचे नियंत्रण करते. उदा. रायझोक्टोनिया, फ्युज्यारियम, पिथियम, स्कोलेरोशियम, व्हर्टीसेलियम इत्यादी.

शेतकरी बांधवांनी वरील जैविक साधनांचा वापर करुन विषमुक्त अन्न तयार करावे. तसेच आपला रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्यावरील खर्च कमी करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे कीटकशास्त्र विभागाचे प्रा.अजयकुमार सुगावे आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.      

********

No comments: