सोयाबीन, हळद या पिकांसह विविध
पिकांच्या लागवडीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
हिंगोली, (जिमाका) दि. 09 : तोंडापूर येथील कृषी
विज्ञान केंद्र, कृषी विभाग व शेकरु
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
होते. या मेळाव्याचे उदघाटन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर यांनी केले.
उद्घाटनपर भाषणात डॉ. देवसरकर
म्हणाले की, कृषी
विज्ञान केंद्राने हा मेळावा योग्य वेळी आयोजित केला आहे. या मेळाव्यामुळे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे, असे सांगून त्यांनी पिकांची
फेरपालट, आंतरपीक पद्धतीद्वारे उत्पन्नात वाढ, माती परीक्षणानुसार नत्र खताची मात्रा विभागून देण्यासंदर्भात व एकात्मिक
रोग व्यवस्थापन या विषयावर प्रकाश टाकला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाचे वनस्पती विकृती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण आपेट यांनी बीजप्रक्रिया
करण्यासाठी भौतिक, रासायनिक आणि जैविक पद्धतींचा वापर करावा. जैविक पद्धतीमध्ये हळद
पिकासाठी 200 ग्रॅम बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा 10 लिटर पाण्यात टाकून हळदीचे
कंद 30 ते 60 मिनिटे बुडवावे. याशिवाय बायो
प्रायमिंग पद्धतीद्वारे कंद लागवडीसाठी 2 किलो बायोमिक्स 100 लिटर पाण्यात
टाकून हळदीचे कंद रात्रभर भिजवून ठेवावे आणि त्यानंतर लागवड केल्यास हळद पिकाची
उगवण चांगली होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा सुद्धा स्वीकार करावा. मात्र
हळदीचे कंद निवडून फक्त निरोगी कंद
लागवडीसाठी वापरावे. इतर पिकांसाठी उपयुक्त सूक्ष्म जीवांचा उपयोग करावा त्यामध्ये
रायझोबियम, अझाटोबॅक्टर, स्फुरद
विरघळवणारे जिवाणू, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास या सूक्ष्म जीवांचा वापर करावा. या सर्व सूक्ष्म जीवांचे
संवर्धन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा
लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी
केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत
सोयाबीन संशोधन प्रकल्पाचे सोयाबीन
पैदासकार आणि प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी.
म्हेत्रे यांनी सोयाबीनचे सुधारित वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन
केले. सुरुवातीला त्यांनी सोयाबीनचे कमी उत्पादन का येते याची प्रमुख करणे सांगून
उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी कशी रणनीती करावी याबद्दल माहिती दिली. त्यामध्ये
नवीन वाणांचा वापर, लागवडीसाठी रुंद सरी आणि वरंबा पद्धतीचा वापर, 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करणे, उगवण
शक्ती तपासूनच किमान 70 टक्के उगवण क्षमतेचे बियाणे वापरावे, पेरणीची खोली 2.5 ते 3 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर पर्यंत
करावी. त्यापेक्षा जास्त खोलीवरचे बियाणे व्यवस्थित उगवणार नाही आणि रोपांची वाढ
होणार नाही, असे सांगितले. प्रती एकरी 26 किलो बियाणे वापरल्यास हेक्टरी 4.5 ते 5.0
लाख झाडांची संख्या मिळू शकते त्यामुळे 26 किलोपेक्षा जास्त बियाणे वापरु नये, असे
सांगितले. पावसाचा खंड पडल्यास 35 दिवसापर्यंतच्या पिकास एक टक्के 13:00:45 खताची
फवारणी करावी आणि 55 दिवसापर्यंतच्या पिकास दोन टक्के 13:00:45 या खताची फवारणी
करावी. म्हणजे सोयाबीनचे पीक ताण सहन करु शकेल. सुरुवातीचे 20-25 दिवस पीक
तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य असे तणनाशक वापरावे. सोयाबीनचे पीक
पाण्यासाठी संवेदनशील असल्यामुळे 25 ते 30 दिवसाच्या पिकास रोपावस्थेमध्ये,
40-45 दिवसाच्या पिकास फुलोरावस्थेमध्ये आणि 50-70 दिवसाच्या
पिकास शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पावसाचा खंड मानवत नाही. त्यामुळे पावसाचा खंड
15-20 दिवसाचा असल्यास वरील तिन्ही अवस्थांमध्ये संरक्षित पाणी तुषार सिंचनाद्वारे
देण्याची तयारी ठेवावी, असे सांगितले.
समारोपीय मार्गदर्शनात जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन तूर आणि कापूस या पिकांचे मुबलक बियाणे उपलब्ध असून
खतांची सुद्धा मुबलक उपलब्धता आहे. डीएपी खताचा तुटवडा असल्यास त्याऐवजी सरळ खते
वापरुन पिकाची गरजेनुसार मात्रा पूर्ण करावी. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
उगवणक्षमता तपासणी मोहीम पूर्ण केली असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची पूर्ण तयारी केली
आहे. मात्र 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला त्यांनी
दिला. पेरणीसाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे यंत्र उपलब्ध
नसल्यास पर्यायी अवजारांचा वापर करुन रुंद सरी वरंबे तयार करावे आणि मूलस्थानी
जलसंधारण करुन पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके
यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे दर मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने विविध पिकांचे
मार्गदर्शन आयोजित करण्यात येत असून त्या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
त्याचप्रमाणे कृषी विभाग आणि भारतीय हवामान शास्त्र विभाग यांच्या संयुक्त
सहकार्याने हिंगोली जिल्ह्यासाठी तालुकानिहाय कृषी सल्ला दर आठवड्याला देण्याची
व्यवस्था करण्यात येत आहे. हा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या फेसबूक आणि यूट्यूब
तसेच ट्विटरवर सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषिविद्या
विभागाचे विषय विशेषज्ञ राजेश भालेराव यांनी
केले. या ऑनलाईन कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषयाचे विषय
विशेषज्ञ अनिल ओळंबे, कीटकशास्त्र विषय विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, पशु विज्ञान विभागाचे कार्यक्रम सहाय्यक डॉ. कैलास गीते, कार्यालयीन
अधीक्षक विजय ठाकरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक शिवलिंग लिंगे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment