04 December, 2024

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ

हिंगोली (जिमाका), दि. 04 : शासनाने दि. 1 जुलै, 2004 आदेशान्वये मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलम 9 च्या खंड (अ) चा वापर करुन लोकहितास्तव जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालयासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी करण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, शैक्षणिक संस्था व इतर कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांकडून केलेल्या अर्जासोबत तसेच शासकीय कार्यालये व न्यायालयासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर 100 रुपये ते 500 रुपये पर्यंतच्या रकमेचे मुद्रांक शुल्क लावलेल्या प्रतिज्ञापत्राची शासकीय अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयाकडून मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य शासनाच्या वरील आदेशानुसार सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून विविध प्रमाणपत्रासाठी मुद्रांक लावलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी करु नये अथवा आग्रह धरु नये, असे जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत . ******

03 December, 2024

औंढा नागनाथ तालुक्यातील युवक-युवतींसाठी डीटीपी, टॅली, ब्युटीपार्लरचे मोफत प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील आदिवासी प्रवर्गातील युवक व युवतीसाठी डीटीपी, टॅली तसेच महिला व युवतींसाठी ब्युटीपार्लरच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, वय 18 ते 45 असावे. यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन प्रशिक्षणासाठी दि. 9 डिसेंबर, 2024 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. डीटीपी व टँली नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किसन धाबे (9370631461), यांच्याशी तर ब्युटीपार्लर प्रशिक्षण नावनोंदणीसाठी दत्ता उचितकर (9834903831) कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे. ******

राष्ट्रीय लोकअदालतीचे 14 डिसेंबर रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 03 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 14 डिसेंबर, 2024 रोजी न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, वाद दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवशंकर वाबळे उमरेकर, सचिव ॲड. अजय वानखडे यांनी केले आहे. ******

मागासवर्गीय विद्यार्थी सायकल खरेदी अर्थसहाय्यासाठी 10 डिसेंबर रोजी होणार ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड

• पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीकडून अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करावयाची आहे. ही निवड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहामध्ये दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सह अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व निवड समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे. ******

ॲग्रिस्टॅक ॲपमध्ये आधार लिंक माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे - प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली (जिमाका),दि.03 : भारत एक कृषिप्रधान देश असून, देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषि क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय जोपासणी, कृषि मालास साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. राज्यात कृषि क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या 55 टक्के आहे. कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाव्दारे अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करुन योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून कृषि क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. अॅग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थ्यांची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या अभिलेखांपेकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पध्दतीने अद्ययावत केले जात असल्याने तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिग संस्थेने राज्यातील जमिनीचे भू संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे. याचा वापर करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन अॅग्रिस्टॅक योजना हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात तालुकास्तरावरील महसूल विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास विभाग, सहकार विभाग आणि इतर संलग्न विभागाची जिल्हास्तरावरुन व्हीडीओ कॉन्फरन्सींव्दारे नुकतीच प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम उपस्थित होते. प्र. जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार दि. 16 डिसेंबर, 2024 पासून ग्रामस्तरावर कॅम्प आयोजित करुन मोहिम स्वरुपात ॲग्रिस्टॅक ॲपमध्ये शेतकऱ्यांची आधार लिंक माहिती भरली जाणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार लिंक करण्याची आणि अनुषंगिक माहिती भरण्यासाठी संमती देवून आपल्याला मिळणाऱ्या कृषि व इतर विभागाच्या सर्व योजनांचे फायदे घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे, *****

बाल हक्क व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त सेनगाव येथे जनजागृती

हिंगोली (जिमाका),दि.03 : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या वतीने सेनगाव येथील पोलीस स्टेशन, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय या विविध ठिकाणी बाल हक्क व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. दत्तक महिना निमित्ताने उपस्थितांना दत्तक इच्छुक पालकास कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. यामध्ये दत्तक इच्छुक पालकांच्या www.cara.wed.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन कायदेशीररित्या बालकास दत्तक घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली. तसेच फोस्टर केअर अँड फोस्टर केअर अडॉप्टेशन प्रक्रियेबाबत प्रतिपालकत्व स्वीकारु इच्छिणाऱ्या पालकांसाठी बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे प्रतिपालकत्व स्वीकारणे तसेच जिल्ह्यात विधवा माता, कुमारी मातांना नको असलेल्या नवजात बाळाचे सुखरुप समर्पण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनाथ, सोडून दिलेले व परित्याग केलेले बालक इत्यादी संदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली किंवा चाईल्ड हेल्प लाईन (1098) यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयाकडून करण्यात आले. तसेच त्याठिकाणी पोस्टर्स, जाहीर आवाहन व संपर्क क्रमांकासह भिंती पत्रके लावण्यात आले. ग्राम स्तरावर बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारी ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे पर्यवेक्षक विकास लोणकर, श्रीकांत वाघमारे व केस वर्कर राजरत्न पाईकराव इत्यादी उपस्थित होते. ******

नवउद्योजक लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली (जिमाका),दि.03 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि राज्य शासन साजरे करीत आहे. यामध्ये केंद्र शासनाने सन-2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिश्श्यातील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंअतर्गंत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी अटी शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थीस अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इच्छूक पात्र नवउद्योजक व्यक्तींनी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विहित नमुन्यात तीन प्रतीत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******