30 November, 2024
जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
हिंगोली (जिमाका),दि.३० : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 2 ते 9 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
सोमवारी सकाळी 8:45 वाजता जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून निघणाऱ्या प्रभात फेरीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे. या प्रभातफेरीमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक, युवती, एनएसएस, एनसीसी, रेड रिबन क्लब, लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी 12 वाजता एचआयव्ही संसर्गित मुले व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे करण्यात आले आहे. यामध्ये 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना व मुलींना सहभागी होता येईल, यासाठी रुपये दीड हजार, एक हजार व पाचशे असे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक आहे. तसेच महाविद्यालयीन युवक, युवती व सर्वसामान्य नागरिकांसाठी सोशल मीडिया स्टॅटिक पोस्ट मेकिंग स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे.
स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत. 1) मातेपासून बाळाला होणाऱ्या एचआयव्ही एड्सपासून संरक्षण, 2) एचआयव्ही एड्स संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधक उपाय. 3) एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017. 4) एचआयव्ही एड्स जनजागृती टोल फ्री क्रमांक 1097 यापैकी कोणत्याही विषयावर स्पर्धेमध्ये सहभागींना सोशल मीडियावर पोस्ट करून ती dpohingoli@mahasacs.org या मेलवर किंवा 9420464455 या क्रमांकावर दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवता येईल. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रुपये दीड हजार, एक हजार व पाचशे याप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त संपूर्ण आठवडाभर तालुकास्तरावर सुद्धा प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही एड्सविषयी व्याख्यान, तपासणी शिबीर, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रक्तदान शिबिरे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच एनजीओमार्फत देहविक्री करणाऱ्या महिलांकरिता आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इत्यादी गर्दीच्या ठिकाणी माहिती शिक्षण व प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे उपक्रम या आठवड्यात राबवण्यात येणार आहेत.
सदरील उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक युवती व सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी केलेले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment