26 November, 2024
आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याचा उद्देश "Foster care and Foster care Adoption" या निमित्त जिल्ह्यातील बालगृहात प्रवेशित अनाथ, निराधार, निराश्रीत इत्यादी प्राधान्याने मोठ्या वयोगटातील बालकांना प्रतिपालकत्व या योजनेचा लाभ मिळवून देणे हा आहे.
या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, प्रसुतीगृह, गर्दीचे ठिकाण व बसस्थानक अशा विविध ठिकाणी भेटी देवून आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त दत्तकासंदर्भात पोस्टर्स, बॅनर लावण्यात आले.
कोणतेही बालक परस्पर दत्तक देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.wed.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दत्तक इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील कुमारी माता, विधवा माता यांना नुकतेच जन्मलेले बाळ नको असेल अशा बाळाचे सुखरुप समर्पन करण्याविषयीची तसेच बालकांचे कायदे व दत्तक प्रक्रिये संदर्भात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी माहिती दिली. तसेच बालहक्क सप्ताह व बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व चाईल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व कर्मचारी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment