14 August, 2018

पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ


पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ

        हिंगोली,दि.15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट, 2018 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी होणार आहे. 
            शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन ‘युवा माहिती दूत’ म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटूंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटूंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.
            15 ऑगस्ट, 2018 रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील युवक-युवती तसेच ‘युवा माहिती दूत’ म्हणून इच्छुक व्यक्तींनी उपस्थित रहावे. तसेच ‘माहिती दूत’ म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02456 - 222 635 या दुरुध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

****

No comments: