लोकसभा निवडणूकीकरीता
खर्चाच्या 12
प्रवर्गांतील 121
बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित
-
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली,दि.20: लोकसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 च्या संदर्भात निवडणूक खर्च कामकाजाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठेमध्ये
सर्वेक्षण करून दरपत्रके मागवून आणि संबंधित सक्षम अधिकृत अभिकरणांकडून प्राप्त
झालेल्या बाबनिहाय दरासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तसेच
त्यांच्या सूचना विचारात घेवून 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूकीत
उमेदवारामार्फत करण्यात येणाऱ्या खर्चाच्या विविध 12 प्रवर्गामधील 121 बाबींचे
प्रमाणित दर अधिसूचित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, राजकीय पक्षांद्वारे निवडणूक
प्रयोजनार्थ निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याच्या
दिनांकापर्यंत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशोब विहीत नमुन्यात व
विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो निवडणूक आयोगास सादर करणे अनिवार्य आहे. राजकीय पक्ष,
उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याद्वारे लोकसभा निवडणूकीत करण्यात येणाऱ्या
सर्व खर्चाचे निवडणूक खर्च सनियंत्रण यंत्रणेमार्फत सनियंत्रण आणि परिनिरीक्षण केले
जाणार आहे. अधिसूचित करण्यात आलेले प्रमाणित दर आधारभूत मानून सर्व लेखांकन
पथकांनी उमेदवारांच्या संदर्भातील अभिरूप निरीक्षण नोंदवहीमध्ये खर्चाच्या नोंदी
घेण्यात येणार आहेत.
लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो
नामनिर्देशित झाला होता ती तारीख आणि निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याची तारीख या
दोन्ही तारखांसह यादरम्यान त्याने केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने
केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशोब विहीत नमुन्यात व विहीत पध्दतीने
ठेवणे आणि तो वेळोवेळी तपासणीसाठी प्राधिकृत यंत्रणेस उपलब्ध करून देणे अनिवार्य
असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment