ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि.9: भारत निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध माध्यमांचे पत्रकार आणि लोक प्रतिनिधी यांना
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देवून जनजागृती करण्यासाठी आज येथील
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल
चोरमारे, कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर व जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे
संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांची प्रमुख
उपस्थिती होती.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन संबंधी माहिती देतांना उपविभागीय
अधिकारी श्री. चोरमारे म्हणाले की, व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणारे
यंत्र असून, मतदान कक्षातील बॅलेट युनिटसोबत ते जोडलेले राहील. मतदार जेव्हा मतदान
करतील तेंव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले
होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला
मत पडल्याची खात्री मतदार करू शकणार आहे. इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया
आहे.
तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनीचे विभाग, मशिनीची
सुरुवातीला घेण्यात येणारी मॉक परीक्षा,
इत्यादी विषयी थेट प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. नागरिकाच्या मनात
कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून या नवीन व्हीव्हीपॅट यंत्राची तरतूद निवडणूक
आयोगाने केली आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने
जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिकांसाठी सर्वत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत
जनजागृतीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही चोरमारे यांनी
सांगितले.
प्रारंभी संपादक, जिल्हाप्रतिनिधी, इलेक्टॉनिक माध्यमांच्या
प्रतिनिधींनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. तसेच संपादक,
जिल्हाप्रतिनिधी, इलेक्टॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी डेमो मतदान केले.
यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खात्री
करता येत असल्याचे ही जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्टॉनिक मिडीयांच्या प्रतिनिधींना
निर्देशनात आणून देण्यात आले.
******
No comments:
Post a Comment