बचत गटांनी संकुचित
विचार न ठेवता
जागतिक बाजार पेठेत
आपले महत्व दाखवून द्यावे
-
मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड
हिंगोली,दि.06: ग्रामीण भागात कल्पकता
असून ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी संकुचित विचार न ठेवता जागतिक बाजार
पेठेत आपले महत्व दाखवून द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी केले.
येथील महावीर भवन येथे आयोजित जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा , हिंगोली महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला
बचत गटांच्या वस्तुंचे कयाधु जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात
आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
श्रीमती शिवराणीताई नरवाडे, आमदार सर्वश्री तान्हाजीराव मुटकुळे, संतोष टारफे,
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण व अर्थ सभापती संजय देशमुख, कृषि व
पशुसंवर्धन सभापती प्रल्हाद राखोंडे,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. प्रविणकुमार घुले व मोठ्या
प्रमाणात बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. तुम्मोड म्हणाले की, ग्रामीण
भागातील कल्पकतेला वाव देण्यासाठी सदर प्रदर्शनाचे दिनांक 06 ते 09 मार्च 2019 या
कालावधीत आयोजन करण्यात आले असून महिला बचतगटांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून
व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागातील
महिला भगिनींना चालना देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण
भागातील बचत गटातील महिलांनी आपल्या भागातील विविध वस्तु विक्री बरोबरच आपल्या
कल्पकतेतून नवनवीन वस्तुंची निर्मिती करुन उत्पनांचे साधन या ठिकाणी उपलब्ध करावे,
असे आवाहनही यावेळी श्री. तुम्मोड यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. घुले यांनी जिल्ह्यातील एकूण बचत गटांची
माहिती, त्यांच्या विविध योजना, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी
आमदार संतोष टारफे व आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही बचत गटातील महिलांना समयोचित मार्गदर्शन केले.
प्रारंभी उद्घाटन समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या
हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व
दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी काही यशस्वी बचत गटातील महिलांनी आपल्या बचत
गटांच्या वाटचाली विषयी सविस्तर माहिती दिली.
सदरील प्रदर्शनामध्ये जिल्हातील दारिद्रय
रेषेखालील एकूण 110 बचत गटांनी सहभाग नोंदविला असून यामध्ये त्यांच्या मार्फत
रानमेवा, विविध प्रकारच्या दाळी, रसायण विरहित गुळ, तुप, खवा, बुरुड पासून तयार
केलेल्या वस्तु, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तु, रुद्राक्षांच्या माळी, पुजेच्या
वस्तु, फोटो फ्रेम, बेंटेक्स ज्वेलरी,वनऔषधी, हर्बल सौंदर्य प्रसाधने, डिंक, बिबा,
विविध प्रकारचे लोणचे इत्यादी वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment