12 March, 2019


दिव्यांग व्यकतींची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहिम
                                                               -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
·   दिव्यांगाकरीता PwD ॲपद्वारे मतदार नोंदणी सुविधा

हिंगोली,दि.12: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दिव्यांग व्य़क्तींची मतदार नोंदणी वाढविण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी  यांनी दिली.
दिव्यांग व्य़क्तींची मतदार नोंदणी करुन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दिव्यांग व्यक्तीकरीता कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाची बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी भाऊसाहेब जाधव आणि डाएटचे प्राचार्य गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, येणाऱ्या कालावधीत दिव्यांग व्यक्तींसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन दिव्यांग मतदारांची नाव नोंदणी करणार आहेत. जिल्ह्यात सुमारे 22 हजार दिव्यांग व्यक्ती असून, त्यातील केवळ 2 हजार 417 जणांची नावे मतदार यादीत आहेत. ज्या दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांची मतदार नोदंणी करुन हे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर रॅम्प निर्माण करणे, व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच काही दिव्यांग व्यक्ती हे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येऊ शकत नाहीत. अशा दिव्यांग व्यक्तींसाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर येण्यासाठी व घरी जाण्यासाठी स्वतंत्र वाहनांची सोय केली जाणार आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वी दिव्यांग व्यक्तींने प्रशासनाकडे नोंद करायची आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थानी देखील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी  व्हावी याकरीता प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधकारी यांनी यावेळी केले.
तसेच दिव्यांग मतदारांवर यावर्षी विशेष लक्ष देण्यात येत असून भारत निवडणुक आयोगाने तयार केलेल्या PwD ॲपद्वारे दिव्यांग व्यक्ती आपला मोबईल क्रमांक आणि पत्ता याची नोंद करावयाची आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअर आदी सुविधांसाठी ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहेत. 1950 या मतदार हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, मतदार यादीतील नाव तपासणे तसेच अन्य मदतीसाठी या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे.

****


No comments: