हिंगोली,दि. 21 : अण्णासाहेब पाटील
आर्थिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव बँकांनी तातडीने निकाली
काढावीत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महामंडळाची आढावा बैठकीत श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे, मराठा समाजातील विविध
संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना श्री. पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची
योजना ही मराठा समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थ्यांच्या उन्नतीसाठी
सुरु करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या तरुणाला मुख्य प्रवाहामध्ये आणून
मराठा समाजात उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत
जिल्ह्यात आतापर्यंत 208 प्रकरणे मंजूर झाली असून 10 कोटी 66 लाख रुपयांचे
लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत बँकांकडे
प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणाचा निपटारा तातडीने करावा. तसेच लाभार्थ्यांना या
योजनेचा लाभ देण्यात कसूर करणाऱ्या बँक व्यवस्थापकांवर कारवाई करावी. तसेच या
बैठकीस गैरहजर असलेल्या बँकेच्या जिल्हा समन्वयकांना नोटीस देवून त्यांच्याकडून खुलासा
घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. या योजनेचे काम पूर्णपणे ऑनलाईन असून सर्व
कागदपत्रे ऑनलाईन जमा करुन तसे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेकडे प्रस्ताव द्यावा
लागतो. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे पूर्णपणे पारदर्शक असून यासाठी बँकानी
सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी
केले.
श्री.
पाटील पुढे म्हणाले की, या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ ग्रामीण भागातील मराठा
समाजातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठी सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी
आपल्या अखत्यारितील बँकांना पत्र पाठवून या योजनेची माहिती द्यावी. आरसीटी व
कौशल्य विकास कार्यालयाच्या माध्यमातून महामंडळाचे लाभ घेवू इच्छिणाऱ्यांना त्या
विषयाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देण्यासाठी तशी तरतूद करण्यात येणार असून
तालुकास्तरावर तेथील बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन महामंडळाच्या योजनेविषयी माहिती
देण्याचा उपक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात
किमान 1 हजार लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यामागची भूमिका विशद
करुन सर्व बँकांना व लाभार्थ्यांना या योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी
लाभार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाना समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान
केले.
जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची ही योजना मराठा समाजातील
लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यशस्वी योजना असल्याचे सांगतांना या महामंडळाचे
प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रत्येक बैठकीत
निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या बैठकीस उपस्थित असलेल्या बँक समन्वयकांना नोटीस
देवून विचारणा करण्यात येईल, असे सागितले.
याप्रसंगी
बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक रविप्रकाश कदम यांचा महामंडळाला सहकार्य जास्तीत
प्रकरणे मंजूर केल्यामुळे त्यांचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते
पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना वितरीत केलेल्या जेसीबी
मशीनचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक
शशीकांत सावंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी
शिंदे, सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment