हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादूर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता दि. 17 ऑक्टोबर, 2020 पासून साजरा करण्यात येत असलेला नवरात्रोत्सव या सणासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी
मंडळानी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार
यथोचित परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य
परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपरिषद , नगर
पंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे
मर्यादित स्वरुपाचें मंडप उभारण्यात
यावेत. सार्वजनिक रस्ता अथवा सार्वजनिक जागेवर मंडप उभारण्यात येऊ नये. या वर्षीचा
नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक
नवरात्रोत्सवाची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. देवीच्या मूर्तीची उंची
सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फुटांच्या
मर्यादेत असावी. जास्तीत जास्त चार व्यक्तींना मुर्तींची स्थापना व विसर्जन करता
येईल. देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनात चार पेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाहीत.
या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे
पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी
करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन
करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रोत्सवासाठी वर्गणी, देणगी
स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी
आकर्षित होणार नाही असे पाहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती
प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
तसेच ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा,
दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये. देवीच्या मूर्तीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनी, मंडळातील सदस्यांनी
सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींचे पालन करुन पूजा करावी.
पुजाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पूजा करण्यास परवानगी राहणार नाही .
आरती, भजन, कीर्तन वा अन्य
धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना चार पेक्षा जास्त लोक असू नयेत. याचे
भाविकांसाठी फेसबूक लाईव्ह, लोकल केबल
किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून प्रक्षेपण करावे. तसेच पर्यावरण नियंत्रण मंडळाने
किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्याचा वापर
करुन ध्वनी किंवा हवेचे प्रदूषण करण्यास
प्रतिबंध असेल. मंदीर परिसर, नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी,
विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण
करण्यासाठी परवानगी राहणार नाही. देवीच्या दर्शनासाठी मंडळानी ऑनलाईन प्रक्षेपण, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक
इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत
जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच
थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था
करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग), स्वच्छतेचे
नियम, हँडवॉश व सॅनिटायझेशनची सुविधा, सर्वासाठी मास्कचा वापर इत्यादी पाळण्याकडे
विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व
विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीतील
विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी
सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण गावातील , नगरातील, इमारतीतील सर्व घरगुती
देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
नगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था
इत्यादींच्या मदतीने कृत्रिम समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी
व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. मंडपात एकावेळी चार पेक्षा जास्त
कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची
व्यवस्था करण्यास मनाई असेल.
प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या
व्यक्तीना घरगुती नवरात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी असेल. परंतु सार्वजनिक
नवरात्रोत्सव साजरा करण्यास मनाई असेल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी नवरात्रोत्सव कालावधीत शेजारील तसेच बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये.
दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा
कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक
स्वरुपाचा असावा. याकरिता रावण दहनाचा
पुतळा चार फुटाच्या मर्यादेत असावा. रावण
दहनासाठी आवश्यक व्यक्तीच (केवळ समिती
मधील सदस्य) कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. प्रेक्षकांना फेसबूक
व इतर समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे
बघण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या
मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका,
पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक
राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना
प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची काटेकोरपणे
अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या
व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा
1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार
शिक्षेस पात्र राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या
कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी , कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही केली जाणार
नाही, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली
यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
*****
No comments:
Post a Comment