01 April, 2021

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 :  जिल्ह्यात ख्रिश्चन धर्मीयांचा दि. 02 एप्रिल, 2021 रोजी गुड फ्रायडे व दि. 04 एप्रिल, 2021 रोजी ईस्टर संडे हा सण आहे.  दि. 13 एप्रिल, 2021 रोजी गुढीपाडवा हा सण आहे. तसेच दि. 14 एप्रिल, 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून त्याच दिवशी मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरु होत आहे.

सध्या कोरोना (कोविड-19) या विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे.

तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोपषे करीत असतात. अशा  विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दि. 02 एप्रिल, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 16 एप्रिल, 2021 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेषी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: