01 October, 2026

पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घेऊन प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न


हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी पाण्याची बचत व उपलब्धतेला प्राधान्य देणारी कामे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रस्तावित करावीत. शासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आज वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सन २०२६-२७ अंतर्गत तालुकानिहाय प्राप्त प्रस्तावांचा आढावा घेतला. बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रदीप धर्माधिकारी तसेच सर्व पंचायत समित्यांचे संबंधित अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तांडा वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याशी संबंधित कामांना प्राधान्य द्यावे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत. ३० सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.


सध्याच्या परिस्थितीत अंतर्गत रस्ते, गटारे आणि समाजमंदिरांची कामे प्रस्तावित करू नयेत. त्याऐवजी शाळांमधील सार्वजनिक शौचालये, वाचनालयासाठी स्वतंत्र कक्ष तसेच पुस्तकांसाठी आवश्यक सुविधा याबाबतचे कामाना प्राधान्य देऊन प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.


योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांवर पुढील आठवड्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

No comments: