हिंगोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २ अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छता ही सेवा" मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना "स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत - विकसित भारत" अशी आहे.
या मोहिमेचाच एक भाग म्हणून १ ऑक्टोबर २०२६ रोजी "एक दिन, एक घंटा, एक साथ" या देशव्यापी श्रमदान मोहिमेचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले.
नरसी (ना.) येथे विशेष श्रमदान मोहीम
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन, धार्मिक व अध्यात्मिक स्थळ असलेल्या नरसी (ना.) येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसर आणि कयाधू नदी घाट किनाऱ्यावर विशेष स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. सदर ठिकाणी मंदिर परिसर, नदी घाट, गावातील सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद हिंगोलीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, ग्रामविकास अधिकारी डी. एन. इंगोले, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ सल्लागार संवाद तज्ञ शामसुंदर मस्के, राजेंद्र सरकटे, रघुनाथ कोरडे, नरसी (नामदेव) मंदिर विश्वस्त मंडळ, पंचायत समिती कर्मचारी प्रमोद मोहिते, संतोष चव्हाण, आसिफ खान पठाण, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, स्काऊट गाईडचे शाळेतील विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही श्रमदान मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
विविध विभागाचे विभाग प्रमुख, पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी ,कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment