27 April, 2023

 

कृषि उत्पन्न बाजार समिती मतदान व मतमोजणी केंद्रात

मोबाईल वापरण्यास बंदी

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पारदर्शक, भयमुक्त व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 3 (चार) अन्वये मतदान व मतमोजणी कामाची गोपनीयता भंग होणार नाही. यासाठी मतदान आणि मतमोजणी केंद्रामध्ये तसेच 100 मीटरच्या परिसरात मोबाईल, पेजर, इलेक्ट्रॉनिक डायरी, आयपॅड, टॅब व तत्सम इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापरण्यास व जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

या आदेशाची मतदान व मतमोजणी केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नवनाथ वगवाड, निवडणूक निर्णय अधिकारी कृषि उत्पन्न बाजार समिती, हिंगोली तथा तहसीलदार, हिंगोली यांनी दिले आहेत.

****

हिंगोली आकाशवाणी केंद्राचे 28 एप्रिल रोजी उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील रिसाला बाजार येथे आकाशवाणी एफ.एम. केंद्र सुरु करण्यात आले आहे. या आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन दि. 28 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय माहिती प्रसारण तथा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, माहिती व प्रसारण , मस्त्य, दुग्ध व पशुपालन राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आ. प्रज्ञा सातव उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन रमेश घरडे, उपमहानिदेशक (क्लस्टर हेड), आकाशवाणी, नागपूर यांनी केले आहे.

****** 

26 April, 2023

 

खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : येथील कृषि विभागाच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 25 एप्रिल, 2023 रोजी खरीप हंगाम 2023 पूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्याक्रमास विभागीय कृषि सहसंचालक, लातुर विभाग लातुर कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तिर्थकर, तंत्र अधिकारी श्री. विर यांनी खरीप हंगाम नियोजन बाबत मार्गदर्शन केले. हरिद्रा येथील कृषि संशोधन तांत्रिक अधिकारी रमेश देशमुख यांनी हळद पिक लागवड बाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर येथील शास्त्रज्ञ श्री. भालेराव यांनी सोयाबीन / तुर/ कापूस पिक लागवड तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. श्री. ओळंबे यांनी हळद पिक मुल्यवर्धन व फळबाग लागवड बाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व करावयाची कामे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी श्री. वाघ, सर्व तालुका कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक सर्व कृषि सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कृषि सहाय्यक ते कृषि पर्यवेक्षक विभागीय परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कृषि पर्यवेक्षक यांचा श्री. तिर्थकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.बी. बंटेवाड यांनी केले व आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी विस्तार श्री.वळकुंडे यांनी केले.

******

 

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडूंचा सत्कार

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : सन 2022-23 या वर्षात हिंगोली जिल्ह्यातील कुस्ती क्रीडा प्रकारातील शालेय व सांगली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती महिला गट कु. भाग्यश्री दत्ता डुमणे ब्रान्झ पदक प्राप्त, राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा चंद्रपूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत व 19 वर्ष मुले या गटात स्वप्नील सावळे व विजय चव्हाण यांनी ब्रान्झ पदक प्राप्त केले. या सर्व खेळाडूंचा सत्कार येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी दि. 25 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉल येथे करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे 1100 रुपये भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

 

****

 

विम्याची रक्कम अदा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्यावत करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे पिकविम्याची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आपले बँक खाते अद्यावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, नोडल अधिकारी बंटेवाड, ॲग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस.डी.सावंत, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, सन 2022 च्या खरीपाचे पिकविम्याचे पैसे त्यांचे बँक खाते अद्यावत नसल्यामुळे 43 लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात आपली बँक खाते अद्यावत करुन घ्यावीत, म्हणजे सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकता येईल. तसेच यावर्षी रब्बी हंगामाचा पीक विमा भरला आहे. तसेच हवामान आधारित फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी सध्या वादळ व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकांची इंटिमेशन विमा कंपनीकडे द्यावेत. तसेच पिक विम्यासंदर्भात प्राप्त झालेला तक्रारीचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.  

****

 

 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषि मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिनांक 1 मे रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर सकाळी 8.00 वाजता होणार आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

 



चला जाणूया नदीला अभियानात हिंगोली जिल्हा अग्रेसर

- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

 

* नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

* दोन महिन्यात शासनाला आराखडा सादर करण्यात येईल-जिल्हाधिकारी

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील कार्यालयीन फळी, नदी प्रहरी, नदी समन्वयक, जलदूत सक्रीय सहभागी होतात आणि त्यांना गावकरी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात ही मोठी जमेची बाजू आहे. कयाधू जनसंवाद यात्रा आज समारोप होत असून हा पहिला टप्पा हिंगोली जिल्ह्याने सर्वात प्रथम पूर्ण केला आहे. तसेच चला जाणूया नदीला अभियानामध्ये हिंगोली जिल्हा अग्रेसर जिल्हा असल्याचे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी यावेळी केले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन हिंगोली, वन विभाग हिंगोली आणि  उगम ग्रामीण विकास संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणूया नदीला अभियानंतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कयाधू नदी जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी डॉ. राणा बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य सर्वश्री. नरेंद्र चुग, जयाजी पाईकराव, नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ.संजय नाकाडे, सुशिलाताई पाईकराव, हर्षवर्धन परसावळे, उपविभागीय अधिकारी डॉ.उमाकांत पारधी, वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवारआदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र हे देवाचे लाडके राज्य असल्याने येथे सरासरी पर्जन्यमान 700 ते 750 मिमी इतके आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे प्रमाण खूप आहे. त्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे सावट खूप मोठे आहे याचे कारण पाणी व्यवस्थापन नाही. राज्यात विकास व्हावा म्हणून यंत्रणा पुढे आली आणि यामुळे पाणी उपसा, वृक्षतोड व अन्य नैसर्गिक साधन संपत्ती संपुष्टात येत आहे. अशा प्रगतीला विकास म्हणावा की विकास म्हणावा हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतो, असे सांगितले.  

कुरुंदा येथे बंधाऱ्याचे 4 पिल्लर असून त्यातील 3 पिल्लर पर्यंत बाजूच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे आणि 01 पिल्लर केवळ नदीसाठी आहे. असे अतिक्रमण वाढले तर नदी मध्ये पाणी मुरण्यासाठी आवश्यक असणारी गवताळ जैवविविधता नष्ट होईल आणि नदीचा प्रवाह बदलून जाईल. नदी काठावरील माती वाहून नदीत येईल आणि नदी पात्र उथळ होईल. त्यामुळे नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. राणा यांनी सांगितले.

जमिनीचे तीन प्रकार असतात जिथे शंभर वर्षात एकदा पुर पोहचतो, जिथे 500 वर्षात एकदा पण पुर पोहचला नाही आणि जिथे 10 वर्षात एकदा पुर येतो. जिथे 10 वर्षात एकदा दुष्काळ अशा ठिकाणी पुर व्यवस्थापन साठी नियोजन होणे गरजेचे आहे. कारण पूर्वी दोन टक्के पुराचे प्रमाण होते. आता 30 टक्के पुराचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कुरुंदा या गावात पुराचे असल्याचे डॉ.राणा यांनी सांगितले.

नदीचे क्रॅक (facture) शोधणे गरजेचे आहे. हे क्रॅक पाणी जिरविण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. शासनाने जर ह्या क्रॅकचा उपयोग घेतला तर पाणी पातळी वाढविण्यासाठी मोलाची भूमिका ठरेल.  शेरणी नदीच्या परिसरामध्ये नदीला पाणी नव्हते म्हणून तेथील लोक बंदूक घेऊन चोऱ्या करीत होते. पण जेव्हा नदी पुनर्जीवित झाली तेव्हा सर्वानी शस्त्र फेकून दिले. पाणी आपल्या जीवनात अविभाज्य घटक तर आहेच त्याचे प्रमाण जर वाढले तर प्रगती होईल आणि तो खरा विकास असेल, असे प्रतिपादन डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

            राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पेतून जला जाणूया नदीला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदीला पुनरजिवित करण्यासाठी ही एक चळवळ तयार करण्यात आली आहे. ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचून नदीवर काम करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यामाध्यमातून खऱ्या अर्थाने नदीला जिवंत करण्यासाठी काम करण्यात येईल. तसेच नदीवरील झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. नदीचे अतिक्रमण, नदीविषयी करावयाच्या कामाचा आराखडा सर्व विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी आमच्यात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवला आहे. येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाला सादर करण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हास्तरावर उपलब्ध निधीचा वापर व लोकसहभाग घेऊन नदीतील छोटी-छोटी कामे करण्यात येणार आहेत. तसेच गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाच्या माध्यमातून नदीतील गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक होऊन त्यांचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            नदीचे पुनरजीवन करण्यासाठी व नदी संरक्षित करण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपणच आपल्या पाण्याचे स्त्रोत वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक जनता आपले काम समजून या मोहिमेत सहभागी व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन पाण्याचा गैरवापर टाळल्यास चला जाणूया नदीला ही संकल्पना नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी संजय दैने यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला दुष्काळ व पुरापासून वाचवविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजेत. या मोहिमेच्या माध्यमातून जलयोध्दा, जलप्रहरी यांची मोठी फळी निर्माण झाली असून या माध्यमातून नदीला अमृतवाहिनी बनविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. यासाठी सर्व नदी प्रहरी यांनी प्रत्येक गावात जाऊन आसना व कयाधून नदीचे पुनरजीवन करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आराखडा तयार करुन तो शासनाला सादर करण्यात येणार आहे. पाण्याचा साचेबध्द ताळेबंद करुन वापर केला तर आसना व कयाधू नदी पुन्हा अविरत वाहतील, अशी अपेक्षा चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयाजी पाईकराव यांनी केले. सूत्र संचालन कांबळे यांनी केले, तर आभार नदी समन्वयक तानाजी भोसले यांनी मानले. पाणी आणि सामाजिक विषयावर शाहीर धम्मानंद इंगोले व त्यांच्या संचनानी प्रबोधन केले.

यावेळी अधिकारी, कर्मचारी, नदी प्रहरी, जलयोध्दे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******