29 April, 2023

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****

 

धनगर समाज बांधवानी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीमधील धनगर प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना स्थिरता निर्माण व्हावी यासाठी धनगर समाजाच्या व्यक्तीसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक धनगर बांधवासाठी लागू करण्यात आलेली आहे.

ग्रामीण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरकुलासाठी संबंधित गावाचे ग्रामसेवक यांच्याकडुन प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयास सादर करण्यात यावेत. त्यानंतर संबंधित गट विकास अधिकारी यांनी परिपुर्ण पात्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे सादर करावे.

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी खालील प्रमाणे अटी / शर्ती लागू आहेत. लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा. लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, लाभार्थ्याच्या नांवे सातबारा किवा 8-अ नमुना असावा. लाभार्थ्यांच्या कुटुंबियांने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुबांतीत एकाच पात्र व्यक्तीस लाभ देण्यात येईल, पात्र लाभार्थी कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीस सेवेमध्ये नसावा. योजनेतील भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंब हे भटकंती करणारे / पालात राहणारे / दारिद्र्य रेषेखालील कुटूंब / घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला व पूरग्रस्त क्षेत्रातील कुटूंबियांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी यांना प्राप्त होणारे घरकुल हे भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/ कुटूंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही. तसे आढळुन आल्यास घरकुलाचा लाभ रद्द करण्यात येऊन मंजुर निधीची वसूली करण्यात येईल. घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतकडुन आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील व घराची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांना स्वतः करावी लागेल.

धनगर बांधवाच्या घरकुल आंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कार्यान्वयन समिती असुन त्या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी (महसूल) हे असून जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, हिंगोली हे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्राप्त होणारे पात्र प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येऊन निधी मागणीसाठी शासनास सदर प्रस्तावाची यादी सादर करण्यात येते.

त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवानी संबंधित पंचायत समितीमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडे घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

******

28 April, 2023

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलेसाठी केलेल्या कार्याला व्याख्यानाद्वारे उजाळा

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने दि. 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व साजरा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मीराताई कदम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे, डॉ.राधिका देशमुख, वर्षा कोठूळे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, गृहपाल व संयोजिका सिंधू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे, डॉ.राधिका देशमुख, वर्षा कोठूळे, सामाजिक कार्यकर्ते  कल्याण देशमुख यांनी  व्याख्यानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल उजाळा दिला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल व संयोजिका सिंधू राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन गृहपाल पल्लवी गिते यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार शिल्पा वाघमारे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुलोचना ढोणे , उषा मुरकुटे, सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, विनोद ठाकरे , मिनाक्षी बांगर, गयाबाई खंदारे, नागनाथ नकाते, राजू ससाणे यांच्यासह समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.                               

***

 

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : भारतीय हवामान विभागाने दि. 29 एप्रिल ते दि. 01 मे, 2023 या कालावधीत मराठवाड्यात हिंगोलीसह काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यतेचा इशारा व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******


 




हिंगोली येथील एफएम रिले केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम

                                                                - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील रिसाला बाजार येथे सुरु करण्यात आलेल्या आकाशवाणी एफ.एम. रिले केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने आज करण्यात आले. आज हिंगोलीसह देशातील 91 तर राज्यातील 8 एफएम रिले केंद्राचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हिंगोली येथे खासदार हेमंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, नाना नाईक, ओम देशमुख, शिवानंद होकर्णे, कपील खंडेलवाल, परभणी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीष जोशी, आदी उपस्थित होते.

यावेळी मागदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम होणार आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाने स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनआंदोलन तयार झाले आहे. गरीब, वंचित समाजातील घटकांना आकाशवाणीच्या माध्यमातून वेळेवर माहिती पोहचविणे ही महत्वाची भूमिका असणार आहे.  गावागावात ऑप्टीकल फायबर पोहोचत असून इंटरनेटच्या माध्यमातून जनतेची सोय झाली आहे. यामुळे वेळेत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. तसेच फ्री-डीटीएच माध्यमातून देशातील गरीब, वंचित घटकातील 4 करोड 30 लाख घरात मनोरंजनाची सोय उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश मोठ्या बदलाला सामोरे जात आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाला पुढे नेण्याचे काम श्री. मोदी करत आहेत. सन 2019 पासूनची असलेली मागणी आज एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. यामुळे या भागातील श्रोत्यांची सोय झाली आहे. आकाशवाणी केंद्र परिपूर्ण सुरु होण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. हिंगोली येथे लवकरच परिपूर्ण असे एलआरएस सेंटर चालू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच याठिकाणी स्टुडिओ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध संस्कृतीचे सादरीकरण, स्थानिक व्यापारी बांधवांना जाहिरात देण्याची सोय होणार असल्याचेही खासदार श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच जगात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 100 कोटी रुपयाची तरतूदही उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. तसेच लिंगो केंद्र सुरु करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे लिगोचा प्रकल्पास लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे खा. हेमंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आ.रामराव वडकुते यांनी आकाशवाणी एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाची मागणी पूर्ण होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. हिंगोली येथे परिपूर्ण आकाशवाणी केंद्र सुरु झाल्यास येथील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन आकाशवाणी एफएम रिले केंद्र हिंगोलीचे तंत्रज्ञ एस.वी. पांडे, तंत्रज्ञ एम.बी. संत, आकाशवाणी नांदेड केंद्राचे केंद्र अभियंता आनंद ठेंगे, वरिष्ठ  तंत्रज्ञ शिवकुमार बुके, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीश जोशी, अभियांत्रिकी विभाग प्रमुख एल.वी.पाथरीकर, अभियंता सहायक समीर ठाकरे, अभियंता सहायक आर.वी.एस.एस. श्रीनिवास यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडिकर यांनी केले.  यावेळी अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

मौजे गोळेगाव येथील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील गोळेगाव ता. औंढा ना. जि. हिंगोली येथे एका अल्प वयीन मुलींचे दि. 23 एप्रिल, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याबाबत पोलीस प्रशासनास गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. के.झुंजारे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती डी.सी.लोकडे, पोलीस उप निरीक्षक बी.एस. खारडे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ती श्रीमती रेशमा पठाण यांनी सदर घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम-2006 अंतर्गत मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे वय मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात, व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परीणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. व बालीकेच्या आई-वडीलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहुन घेण्यात आला.

यावेळी गोळेगाव येथील अंगणवाडी सेविका श्रीमती पुष्पा सरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश थिटे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पी.जी.देशमुख आदिं उपस्थित होते.

******

27 April, 2023

 

जलजीवन मिशनची कामे तात्काळ पूर्ण करावीत

कामात दिरंगाई करणाऱ्याविरुध्द प्रशासकीय कारवाई करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर





हिंगोली (जिमाका), दि. 27 : जलजीवन मिशन अंतर्गतची अपूर्ण कामे व अद्याप सुरु न केलेली कामे तात्काळ सुरु करुन पूर्ण करावेत. या कामात दिरंगाई केल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योनांच्या कामांच्या प्रगतीबाबत तसेच पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत जी कामे अद्याप सुरु झाली नाहीत त्या सर्व कंत्राटदारांना दोन दिवसाच्या आत सुरु करण्याबाबत नोटीस द्यावी. नोटीस देऊनही कामे सुरु न केल्यास त्यांची सुरक्षा अनामत जप्त करुन त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची कार्यवाही निविदेच्या करारातील अटी व शर्तीनुसार करावी. त्याचप्रमाणे जे अधिकारी, कर्मचारी, अभियंता या कार्यक्रमातील कामे करण्यास निष्काळजीपणा , दिरंगाई केल्यास अशा सर्वांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावातील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी अडचण निर्माण करत असतील तर अशा गावांमधील सरपंच यांच्यावर कलम 39(3) नुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करावी. संबंधित गावातील ग्रामसेवकावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये पाणी टंचाईबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकानी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

तसेच पुनरजोडणी अंतर्गतची कामे माहे जून 2023 अखेर पूर्ण होतील असे नियोजन करावे. त्याचप्रमाणे नवीन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे माहे डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व उप अभियंता, शाखा अभियंता, डब्ल्यूएपीसीओएस कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

******