27 April, 2023

 

जलजीवन मिशनची कामे तात्काळ पूर्ण करावीत

कामात दिरंगाई करणाऱ्याविरुध्द प्रशासकीय कारवाई करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर





हिंगोली (जिमाका), दि. 27 : जलजीवन मिशन अंतर्गतची अपूर्ण कामे व अद्याप सुरु न केलेली कामे तात्काळ सुरु करुन पूर्ण करावेत. या कामात दिरंगाई केल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योनांच्या कामांच्या प्रगतीबाबत तसेच पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत जी कामे अद्याप सुरु झाली नाहीत त्या सर्व कंत्राटदारांना दोन दिवसाच्या आत सुरु करण्याबाबत नोटीस द्यावी. नोटीस देऊनही कामे सुरु न केल्यास त्यांची सुरक्षा अनामत जप्त करुन त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची कार्यवाही निविदेच्या करारातील अटी व शर्तीनुसार करावी. त्याचप्रमाणे जे अधिकारी, कर्मचारी, अभियंता या कार्यक्रमातील कामे करण्यास निष्काळजीपणा , दिरंगाई केल्यास अशा सर्वांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावातील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी अडचण निर्माण करत असतील तर अशा गावांमधील सरपंच यांच्यावर कलम 39(3) नुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करावी. संबंधित गावातील ग्रामसेवकावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये पाणी टंचाईबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकानी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

तसेच पुनरजोडणी अंतर्गतची कामे माहे जून 2023 अखेर पूर्ण होतील असे नियोजन करावे. त्याचप्रमाणे नवीन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे माहे डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व उप अभियंता, शाखा अभियंता, डब्ल्यूएपीसीओएस कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: