28 April, 2023

 




हिंगोली येथील एफएम रिले केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम

                                                                - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील रिसाला बाजार येथे सुरु करण्यात आलेल्या आकाशवाणी एफ.एम. रिले केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने आज करण्यात आले. आज हिंगोलीसह देशातील 91 तर राज्यातील 8 एफएम रिले केंद्राचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हिंगोली येथे खासदार हेमंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, नाना नाईक, ओम देशमुख, शिवानंद होकर्णे, कपील खंडेलवाल, परभणी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीष जोशी, आदी उपस्थित होते.

यावेळी मागदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम होणार आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाने स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनआंदोलन तयार झाले आहे. गरीब, वंचित समाजातील घटकांना आकाशवाणीच्या माध्यमातून वेळेवर माहिती पोहचविणे ही महत्वाची भूमिका असणार आहे.  गावागावात ऑप्टीकल फायबर पोहोचत असून इंटरनेटच्या माध्यमातून जनतेची सोय झाली आहे. यामुळे वेळेत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. तसेच फ्री-डीटीएच माध्यमातून देशातील गरीब, वंचित घटकातील 4 करोड 30 लाख घरात मनोरंजनाची सोय उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश मोठ्या बदलाला सामोरे जात आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाला पुढे नेण्याचे काम श्री. मोदी करत आहेत. सन 2019 पासूनची असलेली मागणी आज एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. यामुळे या भागातील श्रोत्यांची सोय झाली आहे. आकाशवाणी केंद्र परिपूर्ण सुरु होण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. हिंगोली येथे लवकरच परिपूर्ण असे एलआरएस सेंटर चालू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच याठिकाणी स्टुडिओ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध संस्कृतीचे सादरीकरण, स्थानिक व्यापारी बांधवांना जाहिरात देण्याची सोय होणार असल्याचेही खासदार श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच जगात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 100 कोटी रुपयाची तरतूदही उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. तसेच लिंगो केंद्र सुरु करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे लिगोचा प्रकल्पास लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे खा. हेमंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आ.रामराव वडकुते यांनी आकाशवाणी एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाची मागणी पूर्ण होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. हिंगोली येथे परिपूर्ण आकाशवाणी केंद्र सुरु झाल्यास येथील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन आकाशवाणी एफएम रिले केंद्र हिंगोलीचे तंत्रज्ञ एस.वी. पांडे, तंत्रज्ञ एम.बी. संत, आकाशवाणी नांदेड केंद्राचे केंद्र अभियंता आनंद ठेंगे, वरिष्ठ  तंत्रज्ञ शिवकुमार बुके, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीश जोशी, अभियांत्रिकी विभाग प्रमुख एल.वी.पाथरीकर, अभियंता सहायक समीर ठाकरे, अभियंता सहायक आर.वी.एस.एस. श्रीनिवास यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडिकर यांनी केले.  यावेळी अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

No comments: