30 April, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना कार्यान्वित होणार

 


हिंगोली (जिमाका), दि. 30  :  जिल्ह्यातील पाचही तालुक्यात महाराष्ट्र दिनी दि. 01 मे, 2023 पासून नव्याने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत, राज्यातील शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी, अशा भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम व दर्जेदार  आरोग्य सुविधा मिळाव्यात हा एकच ध्यास घेऊन  मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याची घोषणा केली आहे, उद्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र हे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापन करण्यात आले आहेत. या आरोग्य वर्धिनी केंद्राचे टप्प्याटप्प्याने रुपांतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात  हिंगोली जिल्ह्यांमध्ये 5 तालुक्यात दि. 1 मे, 2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्ताने हे दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने उद्या दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र राज्यात एकूण 342 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे डिजिटल अनावरण लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार दिली आहे.

 हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक असे एकूण पाच ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहे. हिंगोली येथे पोळा मारोती मंगळवारा येथे, सेनगाव येथे इंदिरानगरमध्ये , कळमनुरी येथे इंदिरा नगरमध्ये, वसमत येथे सम्राट कॉलनी मध्ये तर औंढा नागनाथ येथे जवाई नगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहेत.

या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमा मलमपट्टी यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे . याशिवाय क्ष-किरण, सोनोग्राफी इत्यादी चाचण्यासाठी पॅनल वरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विशेष तज्ञांची सेवा देखील उपलब्ध होतील. सध्या भाड्याचे इमारतीत हे दवाखाने  राहणार आहेत यात ओपीडी स्वरुपात सेवा देण्यात येणार आहे, आपला दवाखान्यांमध्ये बाह्य रुग्णसेवा मोफत औषध उपचार, मोफत प्रयोगशाळा चाचणी, टेलीकन्सेंल्टेशन गर्भवती माताची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषत: संदर्भ सेवा, योगा, व्यायाम बाबतचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहे,  हिंगोली जिल्ह्यात सुरु होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

*****

No comments: