24 April, 2023

 

हिंगोली जिल्ह्याची हिवताप मुक्तीकडे वाटचाल...!!

 

            राष्ट्रीय किटकजन्य रोग नियत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल हा दिवस  साजरा करण्याचे मुख्य कारण आहे. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केलेले आहे. या पार्श्वभुमीवर  सर्व आरोग्य संस्थेत दि. 25 एप्रिल 2023 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणुन जिल्ह्यातील सर्व गाव गावात  वाड्यावर त्या तांडे शहर इत्यादी ठिकाणी  आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत  कंटेनर सर्वेक्षण , जलद ताप सर्वेक्षण, रक्तजल नमुने घेणे, ग्रामपंचायतच्या  मागणीप्रमाणे धूर फवारणी  करणे, आरोग्य शिक्षण, विशेष अबेटिंग राऊंड घेणे तसेच  विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  या आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने थोडक्यात पूढील प्रमाणे माहिती देण्यात येत आहे.

हिंगोली जिल्हयाची हिवताप मुक्ती कडे वाटचाल :- मागील पाच वर्षापासुन हिवताप रूग्ण संखेत घट झालेली आहे. सन 2018 मध्ये जिल्ह्यात  एकूण 158931 रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यात 2 पि व्ही हिवताप रुग्ण आढळून आले. सन 2019 मध्ये जिल्ह्यात एकूण 156246 रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यात 1 पि व्ही हिवताप रुग्ण आढळून आला. सन 2020 मध्ये जिल्ह्यात एकूण 128912 रक्त नमूने गोळा करण्यात आले. त्यात निरंक हिवताप रुग्ण आढळून आले.

सन 2021 मध्ये जिल्हयात एकूण 133553 रक्त नमूने गोळा करण्यात आले. त्यात निरंक हिवताप रुग्ण आढळून आला. मार्च 2022 अखेर जिल्ह्यात एकूण 142097 रक्त नमूने गोळा करण्यात आले त्यात एकही हिवताप दुषित रुग्ण आढळून आला नाही. मार्च 2023 अखेर जिल्ह्यात एकूण 34880 रक्त नमूने गोळा करण्यात आले. त्यात एकही हिवताप दुषित रुग्ण आढळून आला नाही.

            हिवताप :- हिवताप हा आजार ’प्लाझामोडीअम या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनापिफलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे 30 ते 50 कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅलीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

डासाची उत्पत्ती :- स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते.

हिवतापाचा प्रसार :- हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी  रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

हिवतापाची लक्षणे :- थंडी वाजुन ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येवू शकतो. ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलटया होतात.

रोग निदान :- प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी:- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रूग्णाचा रक्तनमुना तपासुन करता येतो. अशा रक्तनमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. (Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना :- रुग्ण शोधणे,  रूग्णावर उपचार डास नियंत्रण

औषधोपचार :- कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रूग्णाने आपला रक्तनमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्विन व प्रायमाक्विन गोळयाचा औषधौपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व 0 ते 1 वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:- आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत. आंगन व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरून घेवून झोपावे. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. फवारलेले घर किमान 2 ते 2.5 महिने सारवू अथवा रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व आरोग्य खात्याकडुन करण्यात येत आहे.

- संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******

No comments: