10 April, 2023

 

शेती विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  कृषि आणि संलग्न क्षेत्रांमधील संथ वाढीमुळे आणि शेतीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने 29 मे, 2007 रोजी राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) सुरु केली आहे. कृषि हवामान, नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन शेतीचा विकास करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

कृषि आणि संलग्न क्षेत्राचा सर्वागीण विकास सुनिश्चित करतांना बाराव्या योजना कालावधीत अपेक्षित वार्षिक वाढ दर साध्य करणे आणि राखणे, कृषि आणि संबंधित क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे हे राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे उदिष्ट आहे. ही योजना ही संपूर्णतः ऑनलाईन असून  https://mahadbt.maharashir.gov.in/Farmer/login या महाडीबीटी प्रणालीव्दारे "अर्ज एक योजना अनेक" यानुसार राबविण्यात येते.

योजनेत समाविष्ठ बाबी :

या योजनेमध्ये शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन अंतर्गत कांदाचाळ उभारणी, अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीकेचा महिला शेतकरी यांना लाभ मिळून देणे इत्यादी बाबी समाविष्ठ आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून वरील योजनांचा लाभ घ्यावा आणि शेती विकासाला चालना द्यावी.  

राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत सन 2022-23 मध्ये शेततळे अस्तरीकरणासाठी भौतिक उद्दिष्ट-186 असून यासाठी 139.50 लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. संरक्षित शेती भौतिक उद्दिष्ट-36 असून यासाठी 114.98 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. कांदाचाळ उभारणीसाठी  भौतिक उद्दिष्ट-72 असून यासाठी 63 लाख रुपये आर्थिक तरतूद मंजूर होती. अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीकासाठी भौतिक उद्दिष्ट- 21 असून 59.80 लाख रुपये लक्षांक मंजुर  आहे. त्यापैकी माहे मार्च, 2023 अखेर शेतावर शाश्वत सिंचनाचे उपलब्धतेसाठी 01 वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण उभारणी झाली असून यासाठी 68 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत कांदा साठवणीसाठी शेतावर 17 शेतकऱ्यांनी कांदाचाळ उभारणी केली असून त्यासाठी 12.686 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच भाजीपाला व फुल पिकाची व्यवसाय पध्दतीने लागवड करण्यासाठी जिल्ह्यात रोपांच्या उपलब्धतेसाठी 2 महिला शेतकन्यांनी अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिकेअंतर्गत भाजीपाला रोपवाटीका उभारणी केलेली आहे. त्यास 4.54 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.

******

No comments: