29 April, 2023

 

धनगर समाज बांधवानी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीमधील धनगर प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना स्थिरता निर्माण व्हावी यासाठी धनगर समाजाच्या व्यक्तीसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक धनगर बांधवासाठी लागू करण्यात आलेली आहे.

ग्रामीण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरकुलासाठी संबंधित गावाचे ग्रामसेवक यांच्याकडुन प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयास सादर करण्यात यावेत. त्यानंतर संबंधित गट विकास अधिकारी यांनी परिपुर्ण पात्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे सादर करावे.

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी खालील प्रमाणे अटी / शर्ती लागू आहेत. लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा. लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, लाभार्थ्याच्या नांवे सातबारा किवा 8-अ नमुना असावा. लाभार्थ्यांच्या कुटुंबियांने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुबांतीत एकाच पात्र व्यक्तीस लाभ देण्यात येईल, पात्र लाभार्थी कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीस सेवेमध्ये नसावा. योजनेतील भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंब हे भटकंती करणारे / पालात राहणारे / दारिद्र्य रेषेखालील कुटूंब / घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला व पूरग्रस्त क्षेत्रातील कुटूंबियांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी यांना प्राप्त होणारे घरकुल हे भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/ कुटूंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही. तसे आढळुन आल्यास घरकुलाचा लाभ रद्द करण्यात येऊन मंजुर निधीची वसूली करण्यात येईल. घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतकडुन आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील व घराची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांना स्वतः करावी लागेल.

धनगर बांधवाच्या घरकुल आंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कार्यान्वयन समिती असुन त्या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी (महसूल) हे असून जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, हिंगोली हे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्राप्त होणारे पात्र प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येऊन निधी मागणीसाठी शासनास सदर प्रस्तावाची यादी सादर करण्यात येते.

त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवानी संबंधित पंचायत समितीमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडे घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: